Congress Supports MLA Rohit Pawars Hunger Strike for Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे उपोषण सुरू केले. राज्य सरकारने जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ सुरूच राहील, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. त्यांच्या या उपोषणाला आता काँग्रेसनेही जाहीर पाठिंबा दर्शवला असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हेदेखील पंढरपुरात जाऊन उपोषणाला बसणार आहे. खुद्द सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या संदर्भातील घोषणा केली आहे.

भाजपा आणि महायुती सरकारवर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपा महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही फसवी असून जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी करून सात-बारा कोरा करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरु केलेल्या उपोषणाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. त्यांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत, त्या सरकारने तात्काळ मान्य करायला हव्यात. रोहित पवार यांच्या उपोषणस्थळी जाऊन मी सुद्धा उपोषण करणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ हेदेखील उपस्थित होते.

दरम्यान, मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मिनाक्षी नटराज यांचा अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द करून भाजपा व निवडणूक आयोगाने खासदारकी पदरात पाडून घेतली परंतु ज्या नोटीस वरून हा अर्ज बाद करण्यात आला होता ती नोटीसच आता तेलंगणातील न्यायालयाने रद्द केली आहे. आता मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्या व नटराजन यांचा अर्ज रद्द करून त्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेतलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्नही सपकाळ यांनी विचारला.

ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष, निवडणूक आयोगाच्या मदतीने व्होटचोरी करता करता आता सीटचोरी करू लागला आहे, त्याचा प्रत्यय मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत आला आहे. मिनाक्षी नटराजन यांनी माहिती लपवल्याचे कारण देत अर्ज बाद करण्यात आला पण ज्या फॉर्म २६ वर ही माहिती दिली नाही असा आक्षेप आहे, त्या पानावर अशा पद्धतीचा कोणताच कॉलम नाही मग ती माहिती तरी कशी दिली जाणार, हा प्रश्न आहेच. काँग्रेसने या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली पण निवडणूक प्रक्रिया संपल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. मुळात जी नोटीस होती ती नोटीसच चुकीची असून नटराजनन यांच्या त्याच्याशी काही संबंध नाही असे स्पष्ट करून तेलंगणातील न्यायालयाने ती नोटीसच रद्द केली आहे. भाजपामध्ये काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.