Rohit Pawar Angry on Tapovan Tree-Cutting for Nashik Kumbh : प्रयागराजच्या कुंभमेळ्यानंतर २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याची जोरदार तयारी चालू आहे. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी तपोवनात साधूग्राम तयार केलं जात आहे. त्यासाठी तपोवनातील १८०० वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. महापालिका प्रशासन व राज्य सरकार लोकांचा विरोध डावलून वृक्षतोडीसाठी प्रयत्न करत आहे. मात्र, याला नाशिककर, निसर्गप्रेमी, समाजसेवी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. दरम्यान, विरोधकांनी यामध्ये मोठा घोटाळा असल्याचा, जमीन बळकावण्याचा डाव असल्याचा दावा केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की “तपोवनातील झाडं तोडून कुंभमेळा संपल्यावर ती जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव आहे.” पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट सदर जागेचा नकाशा शेअर करत आणखी काही आरोप केले आहेत.

“तपोवनची जागा घशात घालण्याचा डाव”

रोहित पवार म्हणाले, “नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात कुंभमेळ्यासाठी राखीव असलेल्या तपोवनच्या जागेवर डोळा ठेवून असलेल्या संधीसाधुना कुंभमेळ्याच्या निमित्ताने जागा घशात घालण्याची संधी दिसत आहे म्हणूनच जनतेचा एवढा प्रचंड विरोध असताना देखील तपोवन बाबतीत सरकारचा अट्टहास सुरु आहे.”

रस्त्याच्या कामात मलिदा खाल्ला जात आहे : रोहित पवार

“२२० कोटींचा MICE HUB प्रकल्प आणि साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली सदर जमीन (तपोवनची जागा) खासगी संस्थेला ३३ वर्षासाठी देऊन हजारो कोटी कमवण्याचा हा डाव आहे. त्यासोबतच कुंभमेळाच्या निमित्ताने होणाऱ्या रस्त्याच्या कामात देखील टेंडर फुगवून मोठा मलिदा खाल्ला जात आहे.”

“श्रद्धेच्या नावाखाली नफ्याचा बाजार मांडणाऱ्या नाशिकच्या कारभाऱ्यांचा हाच डाव आता जनतेने देखील ओळखला आहे. त्यामुळे कोणाचा कितीही मानस असला तरी तपोवनची जागा लाटण्याचा डाव यशस्वी होणार नाही, हे मात्र नक्की.”

मनसे अध्यक्ष काय म्हणाले?

राज ठाकरे म्हणाले, “आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने १,८०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा, नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत?”