Rohit Pawar raises questions on Ajit Pawar plane accident: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातावरून एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. “या अपघातामागे नक्कीच कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे,” असे म्हणत रोहित पवारांनी अपघाताची तांत्रिक बाबींबरोबरच गुन्हेगारी अंगानेही तपासणी केली जावी, अशी मागणी केली आहे. काल मुंबईत मरीन ड्राईव्ह पोलिसांनी DGCA विरोधात एफआयर दाखल करून घेण्यास विरोध केल्यानंतर रोहित पवार आज बारामती येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी पोहोचले. तिथे त्यांनी आपली बाजू मांडल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी वेळ मागून घेतला. यानंतर माध्यमांशी बोलत असताना रोहित पवार यांनी खळबळजनक दावे केले.

पत्रकार परिषदेत बोलत असताना रोहित पवार म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी DGCA कडून एक अहवाल प्रकाशित झाला. सदर अहवाल आल्यानंतर मी आणि काही पक्षांचे आमदार मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात डीजीसीएविरोधात एफआयआर नोंदविण्याची मागणी केली. मुंबईत एफआयआर दाखल होऊ शकतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. पण बीएनएस कायद्याअंतर्गत झिरो एफआयआर दाखल करण्याचा मला अधिकार आहे. देशातील कुठल्याही नागरिकाला एफआयआर दाखल करण्याचा अधिकार आहे. पण तिथे एफआयआर दाखल करून घेतला गेला नाही. त्यामुळे मी आज बारामती येथील पोलीस ठाण्यात आलो आहे.

“आपण यापूर्वीच एफआयआर दाखल करू शकलो असतो, पण खोलात जाण्यासाठी आपण थांबलो होतो. डीजीसीएने २४ फेब्रुवारीच्या अहवालात व्हीएसआर कंपनीचे दोष दाखविले गेले. तसेच व्हीएसआर कंपनीचे पाच विमान ग्राऊंड करण्यात आले. जर ही विमाने ग्राऊंड करण्यात आली असतील तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सदोष विमान चुकून दिले की, जाणूनबुजून दिले? याचा तपास करणे आवश्यक आहे”, असेही रोहित पवार म्हणाले.

आम्ही मागणी करत असलेला एफआयआर हा व्हीएसआर कंपनीविरोधात आहे. तसेच विमानाच्या उड्डाणाला परवानगी ज्या यंत्रणेने दिली, त्या डीजीसीएच्या अधिकाऱ्यांविरोधात आम्ही तक्रार दिली आहे. डीजीसीएमधील कोणत्या अधिकाऱ्यांनी याला परवानगी दिली? या अधिकाऱ्यांना शोधण्यासाठी दुसरा एफआयआर दाखल करण्याची आमची मागणी असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांवरही आरोप

देशाचे नागरी उड्डाण मंत्री ज्या पक्षातून येतात, त्या पक्षाचे आणि व्हीएसआर कंपनीचे थेट आर्थिक व्यवहार आहेत, असाही आरोप रोहित पवार यांनी केला. जर मंत्र्यांच्या पक्षाचे आणि व्हीएसआर कंपनीचे थेट आर्थिक संबंध असतील तर मंत्र्यांचा राजीनामा घेणे आवश्यक आहे. आम्ही मंत्र्यांचे नाव कुठेही घेतलेले नाही. यातून राजकारण करण्याचा आमचा उद्देश नाही. पण लोकांची भावना सरकारने समजून घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.

गुन्हेगारी पैलूंचा तपास व्हावा

AAIB ही संस्था विमान अपघाताचा तपास करत असली गुन्हेगारी पैलू पाहत नाही तर तांत्रिक बाजूने तपास करत असते. डीजीसीए देखील भविष्यात पुन्हा असे अपघात होऊ नयेत, याची दक्षता घेण्यासाठी तांत्रिक बाबींचा तपास करते. पण डीजीसीएचे अधिकारीच या अपघातासाठी जबाबदार असल्याचा आमचा आरोप आहे. त्यामुळे डीजीसीएलाच तपासाचे सर्व अधिकार दिले तर त्यांच्याकडून प्रामाणिक तपास होणार आहे का? असा प्रश्न आमच्या मनात आहे. या अपघाताचा गुन्हेगारी आणि तांत्रिक बाजूने तपास व्हावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

मोठ्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न?

पोलीस प्रशासन एफआयआर दाखल करून घेत नाही, याबद्दल त्यांच्यावर दबाव आहे का? असा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले की, व्हीएसआर कंपनीच्या मालकाचे अनेक नेत्यांशी संबंध आहेत. कंपनीचे संचालक रोहित सिंग याच्या लग्नासाठी महाराष्ट्रातील फार मोठा नेता गेला होता. आंध्रचे मुख्यमंत्रीही त्याच्या लग्नाला गेले होते. आंध्रच्या मुख्यमंत्र्यांच्या कंपनीने व्हीएसआरला निधी दिला होता. तर मध्य प्रदेशच्या कंपनीनेही व्हीएसआरला निधी दिला होता.

“अजित पवारांचे दुर्घटनाग्रस्त लेयरजेट हे विमान सदोष होते, हे आता डीजीसीएकडून सांगितले जात आहे. मग हे विमान अजित पवारांना चुकून दिले की, जाणूनबुजून दिले गेले? हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. यात कोणत्यातरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे, असा संशय आम्हाला आहे. याची चौकशी करण्यासाठी एफआयर दाखल होत नाही, याचा अर्थ कोणत्यातरी मोठ्या व्यक्तीचा वाचविले जात आहे”, असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला.