BMC Election 2026 Voting : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज (दि.२५) मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. मतदारांनी आज सकाळपासून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, राज्यातील काही ठिकाणी मतदार केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. मुंबईत देखील काही ठिकाणी गोंधळ झाल्याचा आरोप केला जात आहे.

राज्यातील घडलेल्या या घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. मतदान केल्यानंतर बोटावर लावली जाणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा आरोप करत त्या संदर्भातील एक व्हिडीओ देखील रोहित पवार यांनी शेअर केला आहे. तसेच रोहित पवार यांनी दोन फोटो शेअर करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. ‘निवडणूक आयोग दात नसलेला वाघ आहे’ आणि ‘जनमतांनी नाही तर भाजपा मॅनेज करून जिंकणार’ असा उल्लेख त्या फोटोवर करत रोहित पवार यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे.

रोहित पवारांनी काय म्हटलं?

“महापालिकेच्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचं समोर येत आहे. आधी मतदान यंत्रणेत बिघाड, नंतर बोटाला लावली जाणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला, त्यानंतर मतदानाची टक्केवारी जाहीर करायला देखील विलंब केला जात आहे. अनेक केंद्रांमध्ये तर ईव्हीएम क्रमवारीनुसार लावलेले नाहीत तर दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टारचं चिन्हही नाही, एकूणच काय तर मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचं काम खुद्द निवडणूक आयोगाकडूनच होतंय”, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

“अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी दर दोन तासांनी जाहीर केली जात नाही, त्याऐवजी सायंकाळी एकत्रच ही टक्केवारी वाढवून बोगस मतदारांसाठी सोय करण्याचा तर हा प्रकार नाही ना? निवडणूक आयोगाने या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन ठराविक वेळेनंतर आकडेवारी जाहीर करावी, अन्यथा आज मतदानाची शाई जशी पुसली जातेय तसं उद्या लोकशाही पुसली जाऊ नये, याची भीती वाटते!”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांनी व्हिडीओ शेअर करत काय म्हटलं?

“मतदानानंतर बोटाला लावलेली शाई अनेक दिवस तशीच रहात असल्याचं आतापर्यंतच्या अनेक निवडणुकींमध्ये बघितलंय… पण आज ही लावण्यात आलेली शाई लगेचच पुसली जात असून अशा प्रकारची शाई वापरणं म्हणजे दुबार आणि बोगस मतदानासाठी निवडणूक आयोगानेच लावलेला हा हातभार नाही का? की बोगस मतदानाच्या माध्यमातून जिंकण्यासाठी महाशक्तीच्या दबावातून अशी शाई वापरण्यात आली की या शाईमध्येही भ्रष्टाचार झाला? याचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा, तसंच अनेक ठिकाणी दुबार मतदार असूनही तिथं डबल स्टार दिसत नाही,याचा अर्थ काय?”, असं रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.