Rohit Pawar shares details about Marine Drive Police Station FIR and statement recording : डीजीसीएने व्हिसीआर या कंपनीविरोधात कारवाई करत त्यांचे चार विमाने ग्राऊंड केली. डीजीसीएचा याबाबतीत अहवाल आल्यानंतर अनेकांविरोधात गुन्हा दाखल कऱण्याकरता आज रोहित पवार मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांची तक्रार पोलिसांकडून ऐकून घेतली जात होती, त्यानुसार त्यांचं स्टेटमेंट लिहायला सुरुवात झाली. तेवढ्यात तिथे मोठे अधिकारी आले आणि त्यांनी एफआयआर दाखल करता येणार नाही असं सांगितलं. त्यामुळे रोहित पवारांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर येऊन माध्यमांसमोर संताप व्यक्त केला आहे.
रोहित पवार म्हणाले, “डीजीसीएकडून सर्क्युलर काढण्यात आलं. त्यानुसार, व्हिएसआर कंपनीच्या पाच विमानांवर कारवाई करून ग्राऊंड केलं. त्या पत्रकानुसार व्हिएसआर कंपनी जबाबदार आहे, असं अप्रत्यक्षपणे समोर आलं. तसंच, डीजीसीएच्या अंतर्गत विमान एअरवर्दी आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी डीजीसीएची असते. त्यासंदर्भात केंद्र सराकरकडून पत्रक आल्यानतंर, त्याचा उपयोग करून आम्ही मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात येऊन एफआयआर करण्याचा प्रयत्न केला.”
महाराष्ट्रातील नागरीक म्हणून एफआयआर करायला गेलो होतो
“एफआयआर करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. नवीन अॅक्टनुसार बीएनएस अंतर्गत एखादा cognizable offence झालाय याबद्दल सर्वांना माहितये. या महाराष्ट्रातील एक मराठी माणसाचा अपघात झालाय. त्यांच्याबरोबर अजून चार जण दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले. जगात असा कोणी आहे का ज्याला हा विषय माहिती नाही? घटना घडली, पोस्टमार्टम रिपोर्ट आहेत. अंत्यविधीला लाखो लोक तिथे आले होते. मग असं असताना या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून एफआयआर करण्याकरता आलो. सीनिअर पीआय तिथे होते. पण एक ज्युनिअर पोलीस अधिकारी म्हणाले की असा एफआयआर दाखल करता येणार नाही.”
अधिकाऱ्यांना कोणाचा दबाव?
“मग आम्ही आमच्या वकिलांमार्फत त्यांना कायद्यातील तरतूद सांगितली. त्यांनी एफआयआर दाखल करायला लॅपटॉप आणला होता, स्टेटमेंट टाइप करायला सुरुवात झाली. तेवढ्यात मोठे अधिकारी डीसीपी तिथे आले, त्यांनी तिथे येऊन सांगितलं की एफआयआर होऊ शकत नाही. कारण ते म्हणाले की तो त्यांचा अधिकार आहे. cognizable offence असेल तर एफआयआर होऊ शकत नाही, ते असं म्हणाले. तसंच ते असंही म्हणाले की तुम्हाला ज्यांना सांगायंचं आहे त्यांना सांगा”, असं म्हणत रोहित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.

