Rohit Pawar meets Raj Thackeray regarding Ajit Pawar plane crash FIR Controversy: अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार हे आक्रमकपणे यामागे घातपात असल्याची मांडणी करत आहेत. ९ फेब्रुवारी नंतर त्यांनी या विषयाला धरून अनेक पत्रकार परिषदा घेतल्या. तसेच मुंबई आणि बारामती येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी डीजीसीए विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शवली. यानंतर आज रोहित पवार यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अजित पवारांच्या अपघाताविषयी त्यांनी गोळा केलेली माहिती सादर केली.
राज ठाकरेंची शिवतीर्थ निवासस्थानी भेट झाल्यानंतर रोहित पवार यांनी बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भेटीचे कारणही विषद केले.
रोहित पवार म्हणाले, अजित पवारांच्या अपघाताविषयीची मी गोळा केलेली माहिती द्यायची असल्यामुळे राज ठाकरेंनी मला तात्काळ वेळ दिली. आज मी बराच वेळ माझ्याकडून सगळ्या घटना समजून घेतल्या. माझ्याकडील माहिती त्यांनी ऐकून घेतली. पोलिसांनी या घटनेत एफआयआर का घेतला नाही? हा प्रश्न त्यांनीही उपस्थित केला. त्यांचा कायद्याचा अभ्यास चांगला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील दोन दाखले दिले. अपघाती मृत्यू झाल्यानंतर एफआयआर घ्यावाच लागतो, हा नागरिकांचा अधिकार आहे. तसेच एफआयआर घेणे पोलिसांवर बंधनकारक आहे.
राज्यातील एका मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यानंतरही एफआयआरच होत नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार? हे येत्या काळात कळेलच. पण राज ठाकरेंनीही अजित पवारांविषयीच्या आठवणी यावेळी जागवल्या, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

जनता यांना सोडणार नाही
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होते की, एक महिन्याच्या आत आम्ही अपघातासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध करू. अपघाताला आज एक महिना होत आहे. आज आणि उद्या आम्ही अहवाला येतो की नाही? याची वाट पाहणार आहोत. जर थातूरमातूर अहवाल दिला तर महाराष्ट्राची जनता यांना सोडणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. तसेच दोन दिवसांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन आपणही एक अहवाल प्रसिद्ध करणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.

