Rohit Pawar on Black Box: बारामती येथे २८ जानेवारी रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात होऊन यात त्यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांचे पुतणे, आमदार रोहित पवार या अपघातावर शंका उपस्थित करत आहेत. घातपात झाल्याचा संशय उपस्थित करत त्यांनी १० फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली होती. यानंतर आज दिल्लीत पुन्हा एकदा त्यांनी या मुद्द्यावर भाष्य केले.
अहमदाबाद येथे जून २०२५ रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताची चौकशी अजूनही सुरू आहे. या घटनेत प्रवासी, क्रू सदस्य आणि इतर मिळून तब्बल २६० जणांचा मृत्यू झाला होता. सदर अपघाताच्या चौकशीतील काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या अपघातामागे वैमानिकाचा हात असल्याचा दावा इटालियन दैनिक कोरीएर डेला सेराने केला आहे.
यासंबंधी रोहित पवार यांना दिल्ली येथील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहित पवार म्हणाले, अहमदाबादच्या अपघाताबद्दल जर असे काही समोर येत असेल तर व्हीएसआर व्हेंचर्सच्या विमान अपघाताबाबतही लक्ष देण्याची गरज आहे. कपूर नावाचे पायलट अजित पवारांच्या विमानाचा मुख्य पायलट होते. त्यांच्यावर मुद्दामहून कुणी दबाव आणला होता का? याचा तपास करावा लागेल. यासाठी मी बाहेरच्या यंत्रणांना तपासात सहभागी करून घेण्याची मागणी करत आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले की, भारतीय यंत्रणा डीजीसीए, राज्याकडून सीआयडी या अपघाताची चौकशी करत आहे. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय यंत्रणाही यात सामील करायला हवी. तरच पारदर्शक चौकशी होण्यास मदत होईल. व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा २०२३ साली झाला होता. त्याचा अद्यापही चौकशी आलेला नाही.
ब्लॅक बॉक्स बंद असेल तर…
व्हीएसआर कंपनीकडून विमानातील ब्लॅक बॉक्स बंद ठेवण्यात येतो, असा दावा काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला होता. या दाव्याबाबत प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, “विमानातील ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. पण काँग्रेसचे प्रवक्ते जर तसे सांगत असतील तर खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये, यासाठी आतापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरण्यात येत आहे. ब्लॅक बॉक्स बंद असल्याचे कारण पुढे केले गेले, तर मी जो घातपाताचा संशय व्यक्त करत आहे, तो सिद्ध होईल, असे आतातरी दिसते.”

