Maharashtra Police Bharti 2024 : राज्यात उद्यापासून (१९ जून) पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. पोलीस दलातील १७ हजार ४७१ रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. विशेष म्हणजे, या १७ हजार रिक्त पदांसाठी १७ लाखांपेक्षा जास्त तरुणांनी अर्ज केल्याचं पुढे आलं आहे. यात उच्च शिक्षित तरुणांचाही समावेश आहे. दरम्यान, यावरून आता रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलीस शिपाई पदासाठी जर उच्च शिक्षित तरुण अर्ज करत असतील, तर यात चुकी कोणाची? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “अजित पवारांचं कुटुंब आता वेगळं”, घराणेशाहीवरील टिकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवारांचं विधान

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

“उद्यापासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होत आहे. १७ हजार ४७१ पदांसाठी तब्बल १७.७६ लाख अर्ज आले आहेत. म्हणजेच एका जागेसाठी तब्बल १०१ अर्ज आलेले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये डॉक्टर्स, इंजिनीयर, वकिलीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचाही यात समावेश आहे. प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण ४० % हून अधिक आहे”, असं रोहित पवार म्हणाले.

“ही चूक कोणाची?”

पुढे बोलताना, “ही चूक कोणाची? इंजिनियरिंग, डॉक्टरकी, वकिली सारखे उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही म्हणून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांची की तरुणांना रोजगार उपलब्ध न करू शकणाऱ्या व्यवस्थेची?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

“दुर्दैवाने यावर चर्चा होत नाही”

“ही बाब महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाणी आहे. पण दुर्दैवाने आपल्या प्रगत महाराष्ट्रात याची चर्चा न होता, मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला कुठले खाते मिळेल, यावर जोरदार चर्चा होते आहे”, अशी खंत ही रोहित पवार यांनी व्यक्त केली. तसेच “आज सर्वच राजकीय पक्षांनी खऱ्या अर्थाने चिंतन करण्याची वेळ आली असून सर्वसामान्यांचेही विषय कधीतरी मुख्य चर्चेत येतील, अशी अपेक्षा आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – पक्षात नाराज असल्याच्या चर्चांवर रोहित पवारांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “माझ्या स्वभावानुसार…”

दरम्यान, राज्यात उद्यापासून पोलीस भरतीला सुरूवात होतं असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे. राज्यात १७ हजार ४७१ जागांसाठी ही भरती होणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. तसेच या १७ हजार पदांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. यामध्ये बँड्समन पदाच्या ४१ जागांसाठी ३२ हजार २६ अर्ज, तुरूंग विभागातील शिपाई पदाच्या १८०० जागांसाठी ३ लाख ७२ हजार ३५४ अर्ज, चालक पदाच्या १६८६ जागांसाटी १ लाख ९८ हजार ३०० अर्ज तर शिपाई पदाच्या ९५९५ जागांसाठी ८ लाख २२ हजार ९८४ अर्ज आल्याचे त्यांनी सांगितलं.