"राज ठाकरेंनी स्वत:ची स्टाईल जपली पाहिजे, भाजपाच्या नादी लागलेले...", रोहित पवारांची 'त्या' पत्रावर खोचक टीका | rohit pawar on raj thackeray letter kasaba peth and chinchwad by election ssa 97 | Loksatta

“राज ठाकरेंनी स्वत:ची स्टाईल जपली पाहिजे, भाजपाच्या नादी लागलेले…”, रोहित पवारांची ‘त्या’ पत्रावर खोचक टीका

“पंढरपूर, नांदेड आणि कोल्हापूरच्या निवडणुकीवेळी…”

Rohit pawar
रोहित पवार ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोट निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकांसाठी भाजपा आणि काँग्रेस आपले उमेदवार अर्ज दाखल करणार आहे. पण, पोटनिवडणुका बिनविरोध पार पडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केलं आहे. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्र लिहित सर्व पक्षांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं. मात्र, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “अंधेरीतील महाविकास आघाडीचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालेलं; तेव्हा राज ठाकरेंनी सर्व पक्षीय नेत्यांना पत्र लिहलं होतं. पण, पंढरपूर, नांदेड आणि कोल्हापूरच्या निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी पत्र काढलं नाही. हा भेदभाव का करण्यात आला, हे राज ठाकरेच सांगू शकतात.”

हेही वाचा : “काँग्रेसमधून बाहेर ढकलण्यासाठी षडयंत्र रचलं”, सत्यजीत तांबेंच्या आरोपांवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“राज ठाकरेंच्या भाषण आणि पूर्वीच्या स्टाईलचा चाहता आहे. त्यात आता कुठेतरी बदल होताना दिसत आहे. भाजपाचा प्रभाव राज ठाकरेंवर पडत असल्याचं दिसत आहे. ही गोष्ट अनेक जणांना भावत नाही. त्यामुळे स्वत:ची स्टाईल जपली पाहिजे. भाजपाच्या नादी लागलेले पक्ष असो अथवा व्यक्ती दोन्ही संपले आहेत,” असेही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले पत्रात?

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहित राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचं नुकतंच दुःखद निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणुका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षालादेखील असतो.”

“अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो. अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

“अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या. त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली,” असं राज ठाकरेंनी म्हटलं.

हेही वाचा : पंडितांनी आपल्या स्वार्थासाठी समाजात उच्चनीचता निर्माण केली; सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान

“आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वांना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 11:30 IST
Next Story
पुण्यासह राज्यातील काही भागांत पुढील काही दिवस थंडीचे