राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्योगपती गौतम अदाणी यांच्या भेटीसाठी अहमदाबादला गेले आहेत. शरद पवार गौतम अदाणी यांच्या घरी दाखल आहेत. अदाणींच्या घरी असलेल्या एका खासगी कार्यक्रमानिमित्त शरद पवार गेले असल्याचं बोललं जात आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.
रोहित पवार म्हणाले, “शरद पवार अदाणी आणि अंबानी यांची भेट घेतात. छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात. आपल्या देशाचा विकास कसा करता येईल? याबाबत सगळ्यांमध्ये चर्चा होत असते. त्यावर पॉलिसी करत असतात. सगळ्या घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी करता येत नाही.”
हेही वाचा : कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांचा पत्ता कट होणार? रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले…
“शरद पवार हे अदाणींचे मित्र आहेत”
शरद पवार आणि गौतम अदाणी भेटीवर मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार यांच्या मनात काय आहे? हे कुणी सांगू शकत नाही. ते अंतरयामी आहेत. त्यामुळे मनात, पोटात आणि ओठात काय हे शरद पवार यांनाच माहिती असते. शरद पवार हे अदाणींचे मित्र आहेत. अदाणी शरद पवारांची वारंवार भेट घेत असतात. त्यामुळे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे,” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
हेही वाचा : “या सगळ्यामागे दिल्लीचा अदृश्य हात”, सुप्रिया सुळेंचा आरोप; म्हणाल्या, “अध्यक्ष दिल्लीला जातात आणि लगेच…”
दरम्यान, शरद पवार आणि गौतम अदाणी यांची यापूर्वीही दोनदा भेट झाली होती. हिंडनबर्गच्या अहवालानंतर २० एप्रिल २०२३ ला अदाणी यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. तर, दुसरी भेट २ जून २०२३ मध्ये झाली आहे.