पंढरपूर : शेतकरी कर्जमाफीतील २०१९ ची अट रद्द करण्याचा निर्णय घ्या, तत्काळ आंदोलन मागे घेतो. कृषिमंत्री व जबाबदार मंत्र्यांनी या बाबत माध्यमांसमोर रविवार संध्याकाळपर्यंत घोषणा करा. अन्यथा सोमवारपासून संत नामदेव पायरीजवळ बसून ‘अन्नत्याग आंदोलन’ सुरू करू, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफी व अन्य मागणीसाठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा शनिवारी दुसरा दिवस होता. या आंदोलनाला दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
शेतकऱ्यांची कर्ज माफी व जाचक अटींसह विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी आमदार पवार यांची वैद्यकीय तपासणी केली. यात त्यांचा रक्तदाब व साखर पूर्ण नियंत्रणात असल्याचे जाहीर केले. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध संघटनेचे पदाधिकारी, शेतकऱ्यांचा पाठिंबा वाढला आहे. शेतकरी नेते अजित नवले यांनी आंदोलनस्थळी भेट देवून पाठिंबा दिला. देवेंद्र फडणीस यांनी अटी शर्थींचा त्रास होणार नाही, हे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान नवले यांनी दिले.
या आंदोलनाबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सलग दोन दिवस पवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यानंतर आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडली. २०१९ च्या कर्जमाफीची अट रद्द झाली असे मुख्यमंत्री, भरणे, सत्ताधारी भाजपच्या पक्षातील बावनकुळे अथवा जबाबदार मंत्र्यांनी जाहीर करावे. माध्यमांना सांगा, तत्काळ आंदोलन मागे घेऊन आपण सरकार सोबतच्या बैठकीला येऊ. अन्यथा सोमवारी पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव पायरी येथे आंदोलन करू, असा इशारा पवारांनी दिला. या आंदोलनात अनेक सहकारी यांची तब्येत खराब होत असल्याचे सांगत असतानाच लोकांनी कुणाचीही गाडी अडवून आंदोलन करू नये. गाड्यांची तोडफोड करू नये, असेही यावेळी पवार म्हणाले.
रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलं : राजेंद्र पवार
मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकले आहे. माझे आणि माझ्या मुलाचे काही केले तरी कर्ज माफ होणार नाही. शेतकऱ्यांच्या कर्जासाठी रोहित दादांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपण इथे बसलोय. जोपर्यंत शेतकरी व्यक्त होणार नाही, तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही. नागरिक म्हणून सांगतो, सरकार त्यांच्याच गुंगीत गुंग आहे, असे आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी सांगितले.
प्रशासन, मंत्र्यांचे चर्चेचे गुऱ्हाळ
आंदोलन मागे घ्यावे, आंदोलनकर्त्यांचे म्हणणे शासन दरबारी पोहचवावे यासाठी प्रशासनाने दोन दिवस आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. प्रांताधिकारी सचिन इथापे, पोलीस प्रशासनातील अधिकारी यांनी भेट घेतली. तर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे दोन दिवस आमदार पवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्कात आहेत आणि सकरात्मक चर्चा होत असल्याचे सांगितले.
