पंढरपूर : रोहित पवार यांनी पंढरपूर येथे केलेले उपोषण हे प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी असल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी गोमूत्र आणि चंद्रभागेचे पाणी शिंपडून शुद्धीकरण आंदोलन केले. दरम्यान शरद पवार गटाकडूनही प्रतिआंदोलन करत या घटनेचा निषेध करण्यात आला.
आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात नुकतेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपोषण केले. मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी त्यांचे उपोषण रविवारी स्थगित केले. दरम्यान हे उपोषण म्हणजे केवळ एक प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी असल्याचा आरोप करत मंगळवारी भाजपच्या किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी गोमूत्र आणि चंद्रभागेचे पाणी शिंपडून शुद्धीकरण आंदोलन केले.
आमदार पवार यांना शेतकऱ्यांविषयी कोणताही कळवळा नाही. आजवर कधीही त्यांच्या प्रश्नांवर न बोलणारे पवार सध्या अन्य प्रकरणांप्रमाणेच या विषयावरही राजकारण करत स्टंटबाजी करत असल्याचा आरोप या वेळी किसान मोर्चाचे माउली हळणवर यांनी केला. तसेच आचारसंहिता लागू असताना आंदोलन केल्याप्रकरणी पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही हळणवर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान शरद पवार गटाकडूनही प्रतिआंदोलन करत या घटनेचा निषेध केला. यावेळी त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली.
