Rohit Pawar post for Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात निधन झाले. पवार कुटुंबासह संबंध महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का होता. बारामती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही मोठी हानी असल्याचे मानले जाते. कुटुंब आणि पक्ष लवकर या दुःखातून बाहेर येईल, अशी प्रार्थना त्यांचे समर्थक करत आहे. दरम्यान आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये ज्या ठिकाणी अजित पवारांना अग्नी दिला गेला, तिथे राख सावडण्याचा विधी पार पडला. या विधीनंतर आमदार रोहित पवार यांनी आपल्या काकांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी अजितदादांबद्दल तक्रार असल्याचे सांगत इतक्या लवकर का सोडून गेलात? असा भावनिक प्रश्न विचारला आहे.

रोहित पवारांनी काय लिहिले?

रोहित पवारांनी राख सावडताना झालेले दुःख शब्दात मांडले आहे. त्यांनी लिहिले, “मा. अजितदादांनी जिथं विकासरुपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नाही.. पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही.. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे… मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. काय झालं, कसं झालं आणि का झालं, या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाहीय… आपल्यात आत्तापर्यंत जे-जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखादा टेपरेकॉर्डप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय. जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरुपात बोलत आहात असा भास होतोय.”

अजितदादा तुमच्याविषयी माझी तक्रार…

रोहित पवार पुढे लिहितात, “अजितदादा तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे. दोन दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे.. प्रत्येकाच्या डोळ्यांतला अश्रूचा पूर कमी होत नाहीये.. हुंदके आणि आक्रोश ऐकून काळजात चर्रर्र होतंय.. आपल्या जाण्याने पाठीमागे दुःखाचे असे पाट वाहतील, याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? एरवी कुणी थोडं जरी चुकलं तर त्याला चार चौघात झाप झाप झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं?”

“महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकूणच ती नक्की घाबरली असती. पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं, हेच तर तुमचं वैशिष्टय होतं. पण दोन दिवसांपासून दुःखाच्या पुरात आकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीलाही नक्कीच पश्चात्ताप होत असेल”, अशी भावना रोहित पवारांनी व्यक्त केली.

दादा, तुमची राख जमा करताना…

रोहित पवार आणि अजित पवार हे महानगरपालिका निवडणुकांपासून एकमेकांच्या जवळ आले होते. त्यांनी एकत्र प्रचारसभा घेतल्या होत्या. तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ते उमेदवारांच्या एकत्र मुलाखती घेत होते. अशातच अजित पवारांच्या निधनामुळे पवार कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणाले, “दादा काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभं रहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, ‘‘अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो? एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे ‘मॉक ड्रील’प्रमाणे चेक करत होतो.. आता उठा, कामाला लागा… महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचंय.. चला, उशीर नका करु…’’