महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला VSR कंपनीच्या विमानाने निघाले होते. मात्र विमान लँड होताना त्यात बिघाड झाला आणि विमानाचं क्रॅश लँडिंग होऊन सदर अपघात झाला. मात्र यानंतर काही दिवसांनी हा अपघात नसून घातपात आहे अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून उपस्थित झाली. अमोल मिटकरींनी तर असाही दावा केला की अजित पवारांच्या विमानाचा वैमानिक कॅप्टन सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर तर नव्हता? दरम्यान रोहित पवार यांनीही दोन ते तीन वेळा पत्रकार परिषद घेऊन शंका उपस्थित केल्या होत्या. आता आज रोहित पवार यांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहेत.
रोहित पवारांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत काय दिसतं आहे?
रोहित पवारांनीही त्याच विमानाचा व्हिडीओ फोटो पोस्ट केला आहे जो व्हिडीओ अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी पोस्ट केला आहे. त्यात व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंग झोपल्याचं दिसून येतं आहे. जय पवार यांनीही हा व्हिडीओ पोस्ट करत कारवाईची मागणी केली होती. त्यापाठोपाठ आता रोहित पवार यांनीही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि अजित पवारांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही असं त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अजिदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही-रोहित पवार
हाच तो VSR कंपनीचा मालक रोहित सिंग, आज तो जणूकाय राज्यातील सगळ्याच मोठ्या नेत्यांपेक्षाही मोठा झालाय आणि याच्याच लग्नाला केंद्रातील मंत्रीपदावरील आणि राज्यातील सत्तेतील बडे नेते गेले होते, म्हणूनच त्याला वाचवण्याचा सगळीकडूनच प्रयत्न होताना दिसतोय.. विमान हवेत असताना स्वतः पायलट असूनही झोप काढतानाचा त्याचा माझे बंधू जय पवार यांनी शेअर केलेला हाच तो व्हिडिओ..!DGCA ची आजपर्यंतची संपूर्ण हालचाल बघता त्यांच्याकडून यावर कारवाई होईल की नाही, याबाबत आमच्या मनात शंका आहे. पण अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना मात्र आम्ही कदापि सोडणार नाही.
रोहिणी खडसेंनीही पोस्ट केला हाच व्हिडीओ
अजित दादा पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी VSR कंपनीच्या मालकाबाबत हा खालील धक्कादायक व्हिडिओ समोर आणला आहे. सरकारने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करायला पाहिजे. यात एक आशादायक चित्र आहे की चांडाळचौकडी कितीही प्रयत्न करत असली तरी अजित दादा पवार यांना न्याय मिळावा यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांची तिसरी पिढी एकत्र आली आहे. अशी पोस्ट रोहिणी खडसेंनी केली आहे.
