राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे काही दिवसांपूर्वी झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. याबरोबरच विविध चर्चा देखील सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक राजकीय नेत्यांनी अपघाताबाबत शंका देखील उपस्थित केल्या यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी या विविध चर्चांबद्दल आपण १० तारखेला आपल्याला काय वाटते? याबद्दल सांगणार असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत अजित पवार यांचा त्या दिवशीचा प्रवास, विमान कंपनी, अपघात झाला ते विमान या सर्व बाबींची माहिती दिली .

रोहित पवार म्हणाले की, काही लोकांनी भावनिक होऊन काही व्हिडीओ टाकले. ते व्हिडीओ दादा परत येतील असे आहेत. सहा जण विमानात होते, सहावी व्यक्ती दादा होते. जी बॉडी तेथे सापडली ती दादांची नव्हतीच, दादा आज येतील उद्या येतील… मला त्यांना सांगायचे आहे की दादा आज परत आले तर मी सुद्धा त्यांनी घट्ट मिठी मारेल.

अपघात झाल्यानंतर सहा दिवस जररोज जेव्हा मी उठत होतो, तेव्हा मला असं वाटत होतं की मी घाणेरडं स्वप्न मी बघत आहे की दादांचा अपघात झाला आणि ते स्वप्नच होतं, खऱ्या अर्थाने ही गोष्ट घडली नाही असं मला वाटत होतं. पण कधीपर्यंत, जेव्हा दादांचा एक स्वेटर तोसुद्धा जळलेला, त्यांची चप्पल, त्यांचं घड्याळ, जे दररोज ते घालायचे आणि ते घड्याळ दादा कधीपण त्यांचा वेळ १५ मिनिटं पुढे ठेवायचे. त्या घड्याळात ९ वाजले होते आणि ते जळलेलं घड्याळ बंद पडलेलं मी बघीतलं. जे कुणी तेथे बघत होते त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सर्व निशब्द झाले होते. कोणालाच काही बोलता येत नव्हतं, असेही रोहित पवार म्हणाले.

मला सर्व लोकांना एवढंच सांगायचं आहे की, जी घटना झाली नाही, जे दादांना झालं नाही, असं आपल्या सर्वांना वाटतंय, तसं नसून ही घटना झाली आहे. आज दादा आपल्यामध्ये नसले तरीसुद्धा ते विचारांनी आपल्या सर्वांबरोबर आहेत, असे रोहित पवार म्हणाले.