राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींचं राजकारण, त्यांच्यातला परस्पर द्वेष वाढला असा आरोप राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर शरद पवारांनी राज ठाकरेंना खोचक सल्ला दिला होता. “राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत”, असा सल्ला शरद पवार यांनी विचारला होता. त्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं होतं. राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देखील देत पवारांच्या राजकारणावर टीका केली. त्यामुळे जातीपातीच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. त्यानंतर आता पुन्हा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंच्या त्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित पवार हे सध्या दिल्लीत असून ते विविध मुद्यांवर केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत. त्यावेळी एबीपी माझासोबत बोलताना राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याबाबत भाष्य केलं आहे. “राज ठाकरेंची लाव रे तो व्हिडिओ ही घोषणा मला एकट्यालाच नाही तर भाजपाच्या अनेक लोकांनी ती आठवते. केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकार विरोधात राज ठाकरे खूप वेगळ्या पद्धतीने बोलले होते. राज ठाकरेंच्या कुठल्याही विधानाला दोन बाजू असतात. राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर जातीवाद वाढला या त्यांच्या विधानाबाबत त्यांचं असंही म्हणणं असू शकतं की, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सर्व मित्र पक्ष हे विकासाच्या मुदद्यावर लढणारे लोक आहेत. राष्ट्रवादी सत्तेत असताना यांना खाली पाडायण्यासाठी भाजपाकडे विकासाचा मुद्दा नव्हता. त्यामुळे जातीवाद वाढवण्यात आला. मग अशा हेतूतून ते राष्ट्रवादीच्या विरोधात बोलत होते की भाजपाच्या हे सांगता येणार नाही. पण खोलात जाऊन पाहिलं तर त्याला वेगळा अर्थ निघू शकतो,” असे रोहित पवार यांनी म्हटले.

राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावं

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचं राजकारण वाढल्याच्या आरोपावर उत्तर देताना शरद पवारांनी जोरदार टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असं खरमरीत उत्तर पवारांनी दिलं होतं. त्यावर प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचण्याचा सल्ला देणाऱ्या शरद पवार यांना प्रत्युत्तर देताना राज ठाकरेंनी आपल्या आधीच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. “मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावं.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना राज ठाकरेंनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. “राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झाला आहे. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला”, असं राज ठाकरे म्हणाले होते. “कोण आहे हा जेम्स लेन? त्याने पुस्तक लिहिलं. तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? तो आता कोण आहे? कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणातून हे सगळं डिझाईन झालं आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितला गेला, ते करणारे अमुक जातीचे लोक आहेत वगैरे बोललं गेलं”, असंही राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar raj thackeray statement about ncp sharad pawar abn
First published on: 15-09-2021 at 14:30 IST