Rohit Pawar emotional post : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाले. यानंतर राज्य तसेच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर आजच त्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देखील घेतील. या सर्व घडामोडींदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या या भावनिक पोष्टमध्ये त्यांनी बारामती येथील कार्यकर्त्यांना एक विनंती केली आहे. अजित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या बॅनरवरती स्वर्गीय असा उल्लेख करू नये अशी विनंती त्यांनी केली आहे.

रोहित पवार काय म्हणाले आहेत?

“बारामतीचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय साहेब आणि मा. अजितदादा…! आजपर्यंत या दोघांपैकी ज्याला सत्तेचं पद मिळायचं त्यांच्या अभिनंदनाचे बारामतीत मोठमोठे बॅनर दिसायचे… त्यावर #उपमुख्यमंत्रीपदी निवड किंवा #भावी_मुख्यमंत्री अशा ठसठशीत अक्षरात मा. अजितदादांचा देखणा आणि राजबिंडा फोटो असायचा.. ते पाहून मन आनंदाने भरून यायचं आणि अभिमानही वाटायचा… पण आज?

डोंगराएवढ्या दु:खापुढं आज पहिल्यांदाच ना पदाचं कौतुक आहे… ना आनंदाचा जल्लोष…! गळ्यात हार घातलेला अजितदादांचा फोटो पाहणं डोळ्यांना सहन होत नाहीय… आज बारामतीत अभिनंदनाच्या जागी श्रध्दांजलीचे बॅनर आहेत, पण हे लावणाऱ्या आणि मा. अजितदादांवर अतीव प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, मा. अजितदादा हे आपल्यातच होते, आपल्यातच आहेत आणि त्यांच्या कामातून ते कायम आपल्यातच राहणार..! त्यामुळं अजितदादांच्या नावापुढं स्वर्गीय शब्द लावण्याचं जसं धाडस मा‍झ्यात नाही तसं आपणही करू नये.!