२८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विमान कंपनी आणि तपास करणाऱ्या संस्थेवर काही प्रश्न उपस्थित केले होते. या पत्रकार परिषदेचा आज तिसरा भाग होता. आमदार रोहित पवार हे दिवंगत अजितदादांच्या विमान अपघातावर वारंवार शंका उपस्थित करत आहेत. अपघाताचा घटनाक्रम आणि एका महिन्यानंतर यासंबंधीत चौकशी करणाऱ्या विविध संस्थांच्या कारभारावर त्यांनी ताशेरे ओढले आहे. कुणाच्या तरी दबावाखाली हा प्रकार घडल्याचा त्यांचा गंभीर आरोप आहे. दादांचा घातपात झाल्याचा त्यांचा संशय आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या विमानाबाबत एक दावा केला आहे.
एकनाथ शिंदेंबाबत रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
कुठलंही विमान कुठेही जात असेल तर फ्लाईट प्लान द्यावा लागतो, एकनाथ शिंदे यांचं विमान दावोसला इराणमधून गेलं, त्यावेळी इराण आणि इराक दोन्ही देशांची संमती VSR ने घेतली नव्हती. त्यामुळे तुम्ही वळला नाहीत तर तुमचं विमान पाडण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. ज्यानंतर विमान इराकमार्गे वळवण्यात आलं पण तिथेही असंच सांगण्यात आलं होतं. मग बहारिनला जाऊन विमान उतरवलं गेलं तिथे तीन तास थांबल्यावर संमती मिळाली. एकनाथ शिंदेंच्याबाबतीतही तोच प्रकार घडणार होता का? यासंबंधीची माहिती डीजीसीएने प्रसिद्ध केली का? यावर एकनाथ शिंदेही बोलू शकतील असं रोहित पवार म्हणाले आहेत.
VSR ने इराण, इराकची संमती का घेतली नव्हती?
VSR विमानांचा प्रश्न समोर आल्यानंतर अनेकांनी वेगळ्या कंपन्यांनी विमानं आणि हेलिकॉप्टर्स वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र अजूनही काही नेते मंडळी या कंपनीची विमानं वापरत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांचं विमान दावोसला चाललं होतं. त्यावेळी VSR कंपनीने इराण आणि इराकची संमती घेतली नव्हती. आंतराराष्ट्रीय विमान उड्डाणांसाठी ही संमती आवश्यक असते. एकनाथ शिंदेंचं विमान इराण आणि इराक वरुन या कंपनीने कसं नेलं? बहारिनला त्यांचं विमान उतरवावं लागलं, त्यानंतर संमती घ्यावी लागली आणि मग त्या विमानाचं उड्डाण झालं. आणखी उशीर झाला होता तर इराणच्या लढाऊ विमानांनी ते विमान पाडलं असतं. ही माहिती आमच्याकडे आली आहे. याबाबत चौकशी होण्याची गरज आहे. एकनाथ शिंदेंना जाऊन तुम्ही विचारु शकता, याबाबत काही कागदपत्रं माझ्याकडे आली आहेत असाही दावा रोहित पवार यांनी केला.
रोहित पवार यांनी सादर केली ऑडिओ क्लीप
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी एक मोठा खुलासा केला. व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा मालक विजय सिंह यांचा रोहित पवार यांच्या एका माणसाला फोन आला होता.एआयबीने आम्हाला क्लीयरन्स दिलाय, माझी खालपासून वरपर्यंत ओळख आहे. अजूनही सरकारमधले लोक आमचे विमान वापरत आहेत आणि अजूनही विमान उडत आहेत असं हा मालक एकाला सांगत होता, यासंदर्भातली व्हिडीओ क्लीप रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत प्ले केली होती.
