महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. दरम्यान त्यांच्या मृत्यूनंतर आता हा अपघात होता की घातपात याबाबतचे प्रश्न उपस्थित होत आहेत. रोहित पवार यांनी आम्हाला सरकारच्या अहवालाची प्रतीक्षा आहे असं म्हटलं आहे. तसंच थातुरमातुर काही गोष्टी समोर केल्या तर महाराष्ट्र काय असतो आणि मराठी माणूस काय असतो ते दाखवून देऊ असंही रोहित पवार यांनी म्हटलंय.

रोहित पवार काय म्हणाले?

सीआयडीला अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा तपास दिला गेला आहे. सीआयडीने महिनाभरात काय केलं आहे? सीसीटीव्ही कॅमेराचं फूटेज ताब्यात घेतलं आहे का? प्रमुख वैमानिक का बदलले गेले? अॅरोचा व्हॉट्स अॅप ग्रुप होता त्यावर गोष्टी समोर आल्या होत्या. अजितदादा कारने जाणार होते ते विमानाने का गेले? दोन थातुरमातुर रिपोर्ट दिले आहेत. आम्ही मात्र वाट पाहतो आहोत की काय प्रकारचा तपास केला गेला आहे याची वाट पाहतो आहोत. प्रमुख अहवाल येणं बाकी आहे असं कालच सांगण्यात येतं आहे. त्यात असणार आहे, काय गोष्टी समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. सत्तेतल्या लोकांचे आणि VSR चे कसे संबंध आहेत ते देखील बघावं लागणार आहे.विमान चालवत असताना VSR कंपनीने काय चुका केल्या, सत्तेतल्या लोकांचे आणि या कंपनीचे कसे संबंध आहे याचे पुरावे आमच्याकडे आहे. थातुरमातुर काहीतरी दिलं मराठी माणूस काय असतो, महाराष्ट्र काय असतो हे आम्हाला दाखवावं लागेल असंही रोहित पवार म्हणाले.

अजितदादा अधिवेशनात नाहीत याची खंत वाटते-रोहित पवार

“माझ्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. मराठी माणूस म्हणून अजितकाकांसाठी मी बोलत राहणार, लढत राहणार. थातुरमातुर तपास केल्यास मराठी माणूस काय ते दाखवून देऊ. अजितदादा नाहीत त्यामुळे अधिवेशनात काय बोलायचं कसं बोलायचं समजत नाही. मला दादा मिश्किलपणे कधी कधी टोमणेही मारायचे. एका रुबाबात अजितदादा अधिवेशनात असायचे. अधिवेशनात रोज येणारा पहिला माणूस अजितकाका असायचे. शिस्त कशी पाळायची, मुद्देसुद कसं बोलायचं हे सगळं अजितदादा बघायचे. मराठी माणूस, मराठी नेता शिस्तप्रिय नेता अधिवेशनात नाही याची खंत वाटते.” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

अजितदादांसाठी आम्ही लढत राहू-रोहित पवार

अजित दादांसाठी आम्ही लढत राहू. ज्यांना अनुभव आहे, ओळखी आहेत त्यांनीही या गोष्टींसाठी पुढाकार घेतला पाहिजे. माहिती घेण्यासाठी सत्तेतल्या लोकांनी जर मदत केली तर तपास वेगाने होईल. पण तसं त्यांनी करावं ही आमची इच्छा आहे, त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा निर्णय त्यांचा असेल असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.