भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर आलं आहे. चंद्रकांत पाटलांकडून करण्यात आलेल्या या विधानावरून आता राजकीय वर्तुळात घमासान सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक शब्दात टीका केली. 

“अपेक्षाभंग झाला की दुःख होणं साहजिकच असतं आणि ते दुःख, ती सल कायम मनाला हतबल करते आणि ही हतबलता सहन न झाल्यास काहीजण मग तोल ढळल्यासारखं बडबडतात. असंच काहीसं भाजपच्या नेत्यांच्या बाबतीत होताना दिसत आहे. जे पन्नासहून अधिक वर्षे संसदीय राजकारणात काम करत आहेत त्या शरद पवार साहेबांबत भाजपाचे काही स्वयंघोषित वरिष्ठ नेते एकेरी उल्लेख करू लागले यात त्यांची चूक नाही, तर हे सत्ता जाण्याचं दुःख आहे आणि ते समजू शकतो, परंतु या पातळीपर्यंत दुःख होईल ही अपेक्षा नव्हती. स्व. प्रमोद महाजन, स्व. मुंडे साहेब, स्व. वाजपेयी साहेब यांच्यासह अडवाणी जी यांनी हयातभर विरोधी पक्षात राजकारण केलं, मात्र त्यांचा तोल कधी ढळला नाही. महाराष्ट्रात मात्र काहींना सत्तेचा दुरावा सहन होत नसल्यामुळे असं होत असावं” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

मराठी अस्मितेच्या संदर्भाचा अर्थ तरी कसा कळेल?

“मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे विरोधी पक्ष नेत्यांनी काढलेले अर्थ, पत्रकार परिषदेत त्यांची देहबोली आणि गमावलेला आत्मविश्वास सर्व काही सांगून जात होता. भाजपाने बंगालमध्ये साम-दाम-दंड-भेद हे सर्वकाही वापरून बघितलं, परंतु बंगाली अस्मितेसमोर ते टिकाव धरू शकले नाहीत, बंगालच्या जनतेने भाजपाला घरचा रस्ता दाखवला. महाराष्ट्रातही भाजपकडून असेच सगळे मार्ग वापरून बघितले जात आहेत. याच संदर्भाने मुख्यमंत्री बोलले. आपल्याच चुकीमुळे आपल्या राज्याच्या हक्काचे जीएसटीचे पैसे बुडत असताना, मुंबईचं आर्थिक महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असताना, महाराष्ट्राचं पाणी गुजरातला पळवलं जात असताना आजवर केवळ बघ्याची भूमिका घेण्यात आली. अशा नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मराठी अस्मितेच्या संदर्भाचा अर्थ तरी कसा कळेल?”, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.

बिगर भाजपशासित राज्यांची मुस्कटदाबी

रोहित पवारांनी भाजपावर केंद्रत सत्तेत आल्यापासून बिगर भाजपशासित राज्यांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप केला आहे. रोहित पवार म्हणाले, “कृषी, उर्जा, धरणे, आर्थिक अधिकार याचंही केंद्रीकरण केलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमकं याच मुद्द्यांवर बोट ठेवलं. शेजारच्या राज्याला वादळात मदत करण्यासाठी तातडीने एक हजार कोटी रुपये मिळतात. आपल्या राज्याला मात्र एक कवडीही दिली जात नाही. स्वतःची तिजोरी भरण्यासाठी राज्यांना मिळणारे कर कमी करून सेस वाढवले जातात. ही कोणती संघराज्य पद्धती? या नेत्यांनी एकदा संविधानात डोकावून बघितलं तर त्यांना संघराज्य पद्धतीचा अर्थ नक्कीच समजेल.”