‘लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडणं, मग संसार नीट कसा होईल?’

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा भाजपाला टोला

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी कोण पुढाकार घेणार भाजपा की शिवसेना हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. कारण महायुतीला जनमताचा कौल मिळाला असला तरीही मुख्यमंत्री कोण होणार यावर सगळे घोडे अडले आहे. अशात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून सरकारवर टीका केली आहे. लग्न ठरवण्याच्या बैठकीतच एवढी भांडणं होत आहेत तर मग संसार नीट कसा होईल असं म्हणत रोहित पवार यांनी ही पोस्ट लिहिली आहे. सरकार स्थापनेला होत असलेल्या उशिरामुळे एक नागरिक म्हणून मी चिंतेत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं?

महाराष्ट्राला असे अनेक नेते लाभले आहेत ज्यांच्याबद्दल संपूर्ण राज्याला नेहमीच आदर राहिला , आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे त्यापैकीच एक. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल आदर असण्याची अनेक कारणे आहेत त्यापैकी एक म्हणजे देशाच्या राजकारणात त्यांचं असलेलं वजन. निवडणूकीपूर्वी युती करताना सत्तेतला वाटा समान असेल असा शब्द शिवसेनेला देवून देखील सध्या भाजप ज्याप्रकारे आपला शब्द फिरवत आहे हे बघता प्रश्न पडतो की आज जर बाळासाहेब ठाकरे हयात असते तर भाजपचं एवढं धाडस झालं असत का ?

राज्याचा एक नागरिक म्हणून सरकार स्थापनेला होत असणारा उशीर मला चिंताग्रस्त करत आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या तडाख्यातून सावरायच्या आधीच त्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत. लवकरात लवकर सरकार स्थापन करून सर्वांनी मिळून जनतेला आधार देण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने आमच्या आघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला , आम्ही त्याचा स्वीकार करून कामाला देखील लागलो आहे मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये सध्या सुरू असणारा वाद हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे.

या वादाची दुसरी बाजू म्हणजे सरकार स्थापन करताना या दोन पक्षात असलेले मतभेद बघता पुढच्या पाच वर्षात खरंच भाजप-शिवसेना राज्याला एक स्थिर सरकार देऊ शकतील का ? यापूर्वी देखील एकत्र सत्तेत असताना युतीमध्ये होणारा वाद सगळ्या राज्याने बघितला आहे. आतादेखील संख्याबळाच्या जोरावर भाजप ज्याप्रकारे शिवसेनेला अडचणीत आणायचा प्रयत्न करत आहे , त्यातून नवीन वाद उद्भवून पुन्हा एकदा राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत अस दिसतंय. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडण झाली तर पुढं जाऊन संसार कसा नीट होणार?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rohit pawar slams bjp in facebook post regarding government formation scj

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या