मुंबई : विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करीत होते. शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरही अशाच प्रकारे इंग्रजांकडून लाठीचार्ज केला जात होता. केंद्र सरकार इंग्रजांनाही लाजवेल असे क्रूर, निष्ठूर आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्था आणि आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या हुकूमशाही सरकारचा तीव्र निषेध करतो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेश सरचिटणीस रोहित पवार यांनी केली आहे.
संसदेवर निघालेला विराट मोर्चा सर्वार्थाने चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. मात्र, लोकशाहीमध्ये रस्त्यावर उतरलेला सर्वसामान्य माणूस सर्वात शक्तिशाली असतो, हे आज सरकारच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. सोनम वांगचूग यांनी २० दिवस अन्नत्याग केले तरीही शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. उलट वांगचूक यांना हुकुमशाही पद्धतीने उचलण्यात आले. आपली चूक सरकार मान्य करत नाही. उलट लोकशाही पद्धतीने आंदोलन देखील करून दिले जात नाही. सरकारने आता तरी शहाणे व्हावे. अकार्यक्षम शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अन्यथा हे आंदोलनच त्यांच्या शेवटाची सुरुवात असेल. सरकार असेच वागत राहिले तर केवळ तांत्रिकदृष्ट्या सत्तेवर असलेल्या या सरकारला तरुण सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही पवार यांनी दिला आहे.
अश्रुधूरांचे नळकांडे फोडून तरुणाईचा आवाज दाबला जाणार नाही
अश्रुधूरांचे नळकांडे फोडून देशातील तरुणाईचा आवाज दाबला जाणार नाही, तो अजून बुलंद होईल. धूर आंदोलकांवर सोडला तरी पाणी मात्र हुकूमशाही वृत्तीच्या निष्ठूर सरकारच्या डोळ्यात आल्याशिवाय राहणार नाही. दडपशाहीच्या माध्यमातून तरुणाईचा आवाज दाबू पाहणाऱ्या केंद्र सरकारचा मी जाहीर निषेध करतो, असेही पवार यांनी म्हटले आहे.
सरकार निष्क्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कवटाळून का बसलंय ?
‘देशभरातील कोट्यवधी तरुण रस्त्यावर उतरला असताना आणि जगभर सरकारची नाचक्की होत असतानाही सरकार निष्क्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कवटाळून का बसलंय ? सरकारचे असे कोणते गुपीत त्यांच्या हातात आहे, ज्याला घाबरून सरकार त्यांना वाचवतंय ?, न्याय आणि हक्क मागणाऱ्या आंदोलकांना सरकारचे पोलिस असे बदडून काढता आहेत. हे सरकार आहे की, रजाकार ? असा सवालही पवार यांनी उपस्थितीत केला आहे.
तर मुंबईतही आंदोलनाचा भडका
तरुणाईला गृहीत धरले तर काय होते, याचा अंदाज दिल्लीतील हुकूमशाहीला आलाच असेल. कोणाचाही नाद करा, पण तरुणाईचा नाद करायचा नाही. महाराष्ट्र सरकारने देखील हे लक्षात घ्यावे. दडपशाहीने आणि कुटनीतीने एमपीएससीच्या ऑनलाइन परीक्षा लादण्याचा प्रयत्न केला, तर याद राखा… मुंबईत या पेक्षाही मोठे चित्र दिसेल, असा इशाराही पवार यांनी दिला आहे.
