अजित पवारांचं २८ जानेवारीला अपघाती निधन झालं. यानंतर रोहित पवार यांनी १० फेब्रुवारीला आणि आज (१८ फेब्रुवारी) दोन पत्रकार परिषदा घेतल्या. यामध्ये त्यांनी विमान अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवार अजित पवारांच्या अपघाताचं राजकारण करत आहेत आणि बुद्धिभेद करत आहेत असं एक विधान केलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी आपण राजकारणातला र देखील उच्चारलेला नाही असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांना उत्तर दिलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले होते?
अजित पवारांच्या अपघाता संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही DGCA ला पत्र लिहिलं आहे. काही गोष्टी तरीही पुढे आणण्याचा प्रयत्न होतो आहे आणि राजकारण करण्याचा प्रयत्न होतो आहे तो दुर्दैवी आहे. जी घटना घडली आहे त्याचं सगळ्यांनाच दुःख झालं आहे. लोकांचा बुद्धिभेद केला जातो आहे. कोण काय म्हणतंय याला फार महत्त्व द्यायला नको. हा सगळा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे. माझी रोहित पवारांना सूचना आहे की त्यांनी आरोप करणं, भानगडी बंद कराव्यात. कुटुंबावर दुःखाचा आघात झाला आहे त्यामध्ये राजकारण कशाला करता? असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते. त्यावर आता रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे.
विखे पाटील यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत क्लेशदायक-रोहित पवार
ज्येष्ठ नेते विखे-पाटील साहेब यांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, आश्चर्यकारक आणि बेजबाबदार आहे. अजिदादांसारखा दुर्दैवी प्रसंग कधीच कुणाच्याही कुटुंबावर ओढवू नये… वेदना काय असते ती ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अजितदादांच्या अपघाताच्या विषयावर मी राजकारणाचा ‘र’ शब्दही उच्चारला नसताना विखे पाटील साहेब ओढून ताणून या विषयाला राजकारणाशी जोडून विमान अपघाताच्या चौकशीला वेगळं वळण तर देत नाहीत ना? काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही, त्यामुळं त्यांनी किमान या विषयाला वेगळे फाटे तरी फोडू नयेत, अशी माझी त्यांना विनंती आहे.
अजित पवार यांचा २८ जानेवारीला अपघाती मृत्यू
अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत पोहचणार होते. २८ जानेवारीला सकाळी पावणेनऊच्या सुमारास बारामतीत त्यांच्या विमानाचं क्रॅश लँडिंग झालं. विमान अपघात झाल्यामुळे अजित पवारांसह पाचही जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्र हळहळला. या घटनेनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांना सल्ला दिला होता. त्यावर आता एक पोस्ट लिहून रोहित पवारांनी विखे पाटील यांना उत्तर दिलं आहे.

