अहिल्यानगर: विधान परिषदेचे सभापती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी गाठीभेटी घेत असले तरी त्यांना मुळात ही निवडणूक लढवताच येणार नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केला आहे. बँकेच्या निवडणुकीत लोक त्यांची जिरवतील अशी टीकाही पवार यांनी केली. कर्जत-जामखेडमध्ये लोकांनी मला ताकद दिली म्हणूनच माझ्या विरोधासाठी भाजपने त्यांना सभापती पद दिले, असा टोलाही पवार यांनी लगावला.
आमदार रोहित पवार आज, बुधवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लवकरच जाहीर होईल, सभापती राम शिंदे उमेदवारीसाठी नेत्यांच्या गाठीभेटी घेत फिरत आहेत, याकडे लक्ष वेधले असता आमदार रोहित पवार म्हणाले, कर्जत- जामखेड मतदारसंघात लोकांनी मला ताकद दिली. त्यामुळेच त्यांना सभापती पद मिळाले आहे. माझ्यामुळेच भाजप त्यांना महत्त्व देत आहे. त्यांना मिळालेले पद ते मिरवत आहेत. पदाच्या माध्यमातून त्यांना मतदारसंघासाठी काही करता आले नाही, म्हणून निवडणुकीचे कारण देऊन ते फिरत असतील. उगाच निवडणुकीच्या नावाखाली बाऊ करता येत आहेत.
मुळात त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उभे राहता येणारच नाही. एवढे मोठे पद असताना त्यांना आणखी पदे कशाला हवी आहेत. पदाचा उपयोग त्यांनी लोकांच्या उपयोगासाठी करायला हवा. परंतु मलाच सगळे मिळाले पाहिजे, या भूमिकेतून ते गाठीभेटी घेत असतील, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.
कांद्याला जेव्हा पाच रुपये भाव मिळत होता तेव्हा ते हेलिकॉप्टर, विमानातून फिरत होते. कर्जमुक्ती योजनेसाठी अन्यायकारक अटी लागू करण्यात आल्या, त्यावेळी आम्ही उपोषण केले. तेव्हा ते आमची चेष्टामस्करी करत होते. परंतु त्यांच्या बॉसला (मुख्यमंत्री) आमच्या मागण्या मान्य करायला लागल्या, कर्जमुक्तीच्या अटी शिथिल केल्या. त्यातून त्यांचे वजन काय होते हे स्पष्ट होते, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.
पदाचा उपयोग राम शिंदे यांनी लोकांसाठी करावा
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नाही असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला असला तरी कोणत्या कारणाने निवडणूक लढवता येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले नाही जिल्हा बँकेपेक्षा मोठेपण त्यांच्याकडे आहे त्याचा उपयोग त्यांनी लोकांच्या कामांसाठी करायला हवा असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.
