स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती नसल्याने बोगस मतदारयाद्यांचा फटका आपल्याला बसेल अशी भीती महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला आहे. त्यामुळेच त्यांच्या आमदारांची खदखद बाहेर येत असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली. भाजपाच्या लेखी मित्रपक्षांची उपयुक्तता संपली असून त्या कुबड्या आता अडकवल्या जातील की चुलीत घातल्या जातील हे पाहावं लागेल असा टोलाही रोहित पवारांनी लगावला. रोहित पवार यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमधून त्यांनी हे भाष्य केलं आहे.
काय म्हटलं आहे रोहित पवार यांची पोस्ट?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती नसल्याने बोगस मतदारयाद्यांचा फटका बसून गेम होईल या भीतीने सत्तेतील इतर दोन मित्रपक्ष प्रचंड चिंतेत पडले आहेत. या चिंतेतूनच अनेक आमदारांची खदखद आता समोर येत आहे. शनिवारचा आमचा मोर्चा बघून तर सत्ताधारी इतर दोन पक्षातील काहींचे फोन आले असून दुबार तसेच बोगस मतदार रोखण्यासंदर्भात चर्चा केली. विधानसभेला गार गार वाटणारा मतदारयाद्यांचा घोळ आता मात्र अवघड जागेचं दुखणे झालय असंच म्हणावं लागेल.
महायुतीत प्रचंड धुसफूस सुरु आहे
एकंदरीत महायुतीतच प्रचंड धुसफूस आहे. ही धुसफूस एवढी वाढलीय की MOA च्या निवडणुकीसाठी सुद्धा अजित दादांना दोन दोनदा बैठका घ्याव्या लागत आहेत. सर्वच ठिकाणी भाजपा हस्तक्षेप करत असून भाजपासाठी दोन्ही मित्रपक्षांची utility संपल्याचीच ही चिन्हे दिसत असून अमित शहा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुबड्या काढून फेकण्याची ही नांदी म्हणावी लागेल. आता या कुबड्या अडकवल्या जातील की चुलीत पेटवल्या जातील हेच बघणे महत्वाचे ठरेल. अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. त्यावर आता काही प्रतिक्रिया येतील का हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
मित्रपक्षांच्या प्रत्येक गोष्टीत भाजप हस्तक्षेप करत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला. त्यामुळेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत त्यांना दोन-दोन वेळी मिटिंग घ्यावा लागल्याचं ते म्हणाले. भाजपच्या दृष्टीने आता मित्रपक्षांची उपयुक्तता संपल्याचा दावाही रोहित पवारांनी केला.
