Rohit Pawar on Sunetra Pawar: अजित पवारांचे निधन झाल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. पक्षाच्या मागणीनंतर सुनेत्रा पवार यांना या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यातच राष्ट्रवादीच्या दोन गटातील विलीनीकरणाच्या चर्चेमुळे हा निर्णय आणखी कसोटीचा ठरला. शरद पवारांचा राष्ट्रवादी गट आणि उर्वरित पवार कुटुंबाला या निर्णयाबाबत विश्वासात घेतले नसल्याचा मुद्दाही समोर आला. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातून कुणीही शपथविधीला उपस्थित राहिले नाही. मात्र आता शपथविधीनंतर अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट टाकून आपल्या काकींना शुभेच्छा दिल्या आहेत.

आज सकाळी शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकार परिषद घेऊन आजच्या शपथविधी सोहळ्याची आपल्याला कल्पना किंवा निमंत्रण नसल्याचे म्हटले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच अजित पवारांचे अकाली निधन झाले. त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करणे हीच आमची इच्छा आहे, असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेमुळे आज दिवसभरात अजित पवार गटाला या प्रश्नावर उत्तर द्यावे लागले. अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या तीनच दिवसात शपथविधी सोहळा घेण्याचे आव्हान पेलत असताना विलीनीकरणाच्या प्रश्नांना तोंड देत असताना अजित पवार गटाच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागली.

त्यातच आता रोहित पवारांनी केलेली पोस्ट चर्चत आहे. रोहित पवार म्हणाले, “राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू.”

त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात

रोहित पवार पुढे म्हणाले, “डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही..!”

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

दरम्यान दिवसभरातील घडामोडी आणि सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपले मत व्यक्त केले. सुप्रिया सुळे आज सायंकाळी बारामतीहून पुण्याला जात असताना माध्यमांनी त्यांना आजच्या घडामोडींबाबतची प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या, “उद्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे मला दिल्लीला जावं लागत आहे. आता माझी फ्लाईट असून मी दिल्लीला चालले आहे. कारण मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची सभागृह नेता असल्यामुळे मला दिल्लीला जावे लागत आहे. शपथविधीबाबत मला काही माहिती नाही.”