Rohit Pawar on Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणी अद्यापही चौकशी सुरू आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे. भोंदू खरात प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी, व्यावसायिक अडकले असल्याचा दावा करून या प्रकरणातून सुटण्याकरता मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. एक्सवर पोस्ट करून रोहित पवारांनी असा दावा केला आहे.
१ टक्के सत्यही समोर आलं नाही
अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर अनेक नेते मंडळींचे फोटो समोर आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, जयंत पाटील, सुनील तटकरे, बच्चू कडू यांसह अनेक नेत्यांचे फोटो व्हायरल झाले. तसंच, अनेक बडे अधिकारी आणि व्यावसायिकही खरातच्या जाळ्यात अडकले असल्याचा दावा करण्यात येतोय. याबाबत रोहित पवार म्हणाले, “भोंदू खरात प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी, व्यावसायिक अडकले असून त्या प्रकरणातील १% सत्य देखील समोर आलेले नाही. समोर जे काही आले आहे ते केवळ छोटे मासे आहेत.”
प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी…
“यामध्ये अनेक मोठे मासे देखील असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय म्हणून हे प्रकरण नोंद होणार आहे. या प्रकरणाच्या तपासातून सुटका करून घेण्यासाठी किंवा नाव बाजूला काढण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत असल्याची माहिती समजत आहे. मोठमोठ्या रकमा घेऊन अनेकांना यातून अलगद बाहेर काढले जात आहे. ज्यांना या प्रकरणातून बाहेर काढायचे आहे त्यांना भोंदू विरोधात फसवणूक केल्याची तक्रार करायला सांगितले जाते आणि या प्रकरणातून बाहेर काढले जाते अशी ही पद्धती असल्याची माहिती आहे. या माहितीची शहानिशा करून गृहमंत्री महोदयांनी योग्य ती कारवाई करावी”, अशी विनंतही त्यांनी केली आहे.
रुपाली चाकणकरांची आज चौकशी
दरम्यान, खरात प्रकरणात चाकणकर यांचा नेमका संबंध काय, याविषयी कुतूहल वाढले असताना रविवारी रुपाली चाकणकर या एसआयटीसमोर उपस्थित राहण्यासाठी नाशिक येथे आल्या. रविवारी सकाळी त्या पुण्याहून नाशिककडे निघाल्या. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत असलेल्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती पुढे आली. त्यांची चौकशी सुरू असून आपण तपासात सहकार्य करत असल्याची प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
