मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञाताकडून झालेल्या गोळीबार प्रकरणात अनेक धागेदोरे सापडत आहेत. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात एनआयएने अनमोल बिष्णोईला अटक केली असून चौकशीसाठी त्याला मुंबईत आणण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागितली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित केला असता सरकारने दिलेल्या लेखी उत्तरावर आपण समाधानी असून, हा विषय वाढवत नसल्याचे मिलिंद नार्वेकर यांनी सांगितले. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या इमारतीवर एका अज्ञाताने गोळीबार केला होता.

मुंबई पोलिसांनी १३ आरोपींना ताब्यात घेतले. बिष्णोईचा महाराष्ट्रातील हस्तक शुभम लोणकर याच्या भावाला अटक करण्यात आली आहे. शुभम लोणकरवरही योग्य कारवाई केली जाईल. तो सध्या परदेशात बसून फोन करून धमक्या देतोय. आधी काँग्रेस पक्षातील आमदाराला फोन करून धमकी दिली. आता भाजप आमदाराला देखील त्याने धमकीचा फोन केला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

एनआयएच्या माध्यमातून अनमोल बिष्णोईला अटक करण्यात आली आहे. चौकशीसाठी त्याला मुंबईत आणावे, अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. एनआयए कायद्यानुसार अधक काळ पोलीस कोठडी मिळत असल्याने त्यांच्या कारवाईनंतर मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. धमकीचे कॉल आल्यावर सेलिब्रेटी अधिक घाबरतात त्यामुळे त्यांना पाेलीस संरक्षण दिले जाते, मात्र यावेळी मुंबईत कोणतेही गँगवॉर होणार नाही असे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले. लोणकर हा अकोला जिल्ह्याचा रहिवासी असून त्यांनी काँग्रेस आणि भाजप आमदारांनाही पैशासाठी धमाकावल्याची बाबही त्यांनी सभागृहासमोर मांडली.

लोणकर हा अकोला जिल्ह्यातील रहिवाशी आहे. आमच्या भाजप आमदाराकडे इतका पैसा नाही. ते गरीब असून, त्यांना देखील फोन केला. जिथे जिथे त्यांनी हे कृत्य केले आहे. तिथे पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे. मी यावेळी सभागृहाला असे आश्वासन देतो की, गँगवॉर होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.