scorecardresearch

धाराशिव : निवडणुकीत झालेल्या खर्चाच्या वसुलीसाठी लाचखोरी; एक लाख रुपये स्वीकारताना सरपंच महिलेचा पती गजाआड

परंडा तालुक्यातील रोहकल गावच्या महिला सरपंच यांच्या पतीला एक लाख रुपयांची रोकड स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी जिल्हा परिषदेच्या उपहारगृहातून ताब्यात घेतले.

Rohkal Sarpanch women husband bribe
निवडणुकीत झालेल्या खर्चाच्या वसुलीसाठी लाचखोरी; एक लाख रुपये स्वीकारताना सरपंच महिलेचा पती गजाआड (प्रातिनिधिक छायाचित्र)

धाराशिव: निवडणुकीत आपण लाखो रुपये खर्च केले आहेत, त्यामुळे आता आपण वसुली करणार, काम सुरू ठेवायचे असेल तर गुपचूप पैसे द्या, अन्यथा वाईट परिणाम होतील, अशी धमकी देत सरपंच महिलेच्या पतीने लाचेची मागणी केली. परंडा तालुक्यातील रोहकल गावच्या महिला सरपंच यांच्या पतीला एक लाख रुपयांची रोकड स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी जिल्हा परिषदेच्या उपहारगृहातून ताब्यात घेतले.

ग्रामपंचायतमधील काम सुरू ठेवण्यासाठी एका खाजगी ठेकेदार कंपनीला दीड लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सरपंच महिलेच्या पतीला गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. दीड लाख रुपयांची मागणी करून एक लाख रुपयांची रोकड स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. हनुमंत पांडुरंग कोलते असे लाच स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. परंडा तालुक्यातील रोहकल ग्रामपंचायतमधील ठेकेदारीची कामे सुरू ठेवण्यासाठी हनुमंत पांडुरंग कोलते यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली होती. गुरुवारी सकाळी रोकड स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाखो रुपये खर्चून आपण या निवडणुकीत निवडून आलो आहोत. त्यामुळे आता आपण वसुली करणार, तुम्ही गुपचूप पैसे द्या अन्यथा परिणाम वाईट होतील, काम करू देणार नाही, अशी धमकी देत लाचेची मागणी केल्याची धक्कादायक बाब रेकॉर्ड केलेल्या संभाषणातून समोर आल्याचे लाचलुचपत विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – “…म्हणून वेगळ्या निकालाची अपेक्षा नव्हती,” राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रकरणावर संजय राऊतांनी मांडली भूमिका

कोलते हे राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित आहेत. त्यांच्या पत्नी रोहकलच्या सरपंच असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याही त्या संचालक आहेत. कोलते दाम्पत्याच्या संपत्तीची लाचलुचपत विभागाने चौकशी करावी, अशी मागणी आता केली जात आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामात अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधीकडून ठेकेदार कंपनीची पैशासाठी अडवणूक केली जात होती.

हेही वाचा – “इतक्या तातडीने कारवाई करण्याची गरज काय?” माहीम मजार प्रकरणावरून अबू आझमींचा सरकारला सवाल

एनर्जी प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये पर्यवेक्षक असलेल्या मेनकर यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. आरोपी हनुमंत पांडुरंग कोलते यांनी कंपनीचे सुरू असलेले काम बंद पाडले होते. पुन्हा काम सुरू करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर एक लाख रुपयात व्यवहार मिटला. पंचांसमक्ष १ लाख रुपये लाच रोख स्वरुपात स्वीकारताना धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपहारगृहात आरोपी कोलते यास ताब्यात घेण्यात आले. शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 17:44 IST

संबंधित बातम्या