scorecardresearch

मुख्य अभिनेता आजारी पडल्याने प्रतिस्पर्धी संघातील कलाकाराकडून भूमिका

रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या राज्य संगीत नाटय़ स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील कलारंग नाटय़ प्रतिष्ठानच्या कलाकारांनी प्रतिस्पर्धी संघातील कलाकार अचानक आजारी पडल्यावर त्याची भूमिका स्वत: करून दिलदारपणाचा प्रत्यय दिला.

रत्नागिरी : रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या राज्य संगीत नाटय़ स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील कलारंग नाटय़ प्रतिष्ठानच्या कलाकारांनी प्रतिस्पर्धी संघातील कलाकार अचानक आजारी पडल्यावर त्याची भूमिका स्वत: करून दिलदारपणाचा प्रत्यय दिला. येथे आयोजित हीरकमहोत्सवी संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोव्यातील मिळून एकूण १६ संस्था सहभागी झाल्या. त्यापैकी सावंतवाडी येथील क्षितिज इव्हेंट्स या संस्थेचे कलाकार ‘मत्स्यगंधा’ नाटक सादर करत असताना संस्थेचे सर्वेसर्वा आणि या नाटकात भीष्माची महत्त्वाची भूमिका साकारत असलेले बाळ पुराणिक यांना दोन प्रवेशांनंतर अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.

भीष्माच्या भूमिकेशिवाय नाटकाचे पुढील प्रवेश शक्य नव्हते आणि तसे झाल्यास नाटक स्पर्धेतून बाद झाले असते; पण त्यानंतर स्पर्धेत हेच नाटक सादर करत असलेल्या वरवडे (ता. रत्नागिरी) येथील कलारंग नाटय़ प्रतिष्ठानचे नितीन जोशी यांनी या संघासाठी भीष्माची भूमिका केली आणि रसिकांनी टाळय़ा वाजवून दाद मिळवली. परीक्षकांनी या साऱ्या प्रसंगाबद्दल जाहीर गौरव केला. परीक्षकांतर्फे मुकुंद मराठे यांनी ‘शो मस्ट गो ऑन’च्या या भावनेचे मन:पूर्वक कौतुक केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Role from rival cast actor lead actor musical drama competition color ysh

ताज्या बातम्या