अहिल्यानगर: महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती व महाविकास आघाडी एकत्रित लढण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून दोन्हीकडे जागा निश्चितीसाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये निर्णयाचे अंतिम अधिकार खासदार नीलेश लंके यांच्याकडे तर महायुतीमध्ये निर्णयाचे अंतिम अधिकार पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहेत.

महापालिकेचे १७ प्रभाग असून एकुण ६८ जागा आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर आज, बुधवारपासून महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांच्यामधील प्रत्यक्ष जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली. आज राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व शिंदे गटाचे शहर प्रमुख सचिन जाधव, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, माजी नगरसेवक संजय शेंडगे व गणेश कवडे यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा झाली.

पालकमंत्री विखे यांनी दिलेल्या सूचनेनुसार तिन्ही पक्षांकडून चार जणांची समिती चर्चेसाठी नियुक्त केली जाणार आहे. भाजपकडून समितीतील चार जणांची नावे निश्चित करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे चर्चेसाठी एकटे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते उपस्थित होते. ही नावे उद्या, गुरूवारपर्यंत पक्षश्रेष्ठी कळवतील, असे मोहिते यांनी सांगितले.

 राष्ट्रवादीकडून सर्वाधिकार आमदार जगताप यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. महायुती करण्यासाठी अद्याप जागा वाटपाचा कोणताही ‘फॉर्म्युला’ निश्चित करण्यात आलेला नाही. प्रत्येकाकडील संभाव्य उमेदवार, एकूण जागा, कोणत्या जागांवर कोण इच्छुक आहेत, याची माहिती तपासण्यात आल्याचे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष मोहिते व शिंदे गटाचे शहर प्रमुख जाधव यांनी सांगितले.

दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (ठाकरे गट) यांच्यामध्येही महाविकास आघाडी करूनच निवडणूक लढवण्याचे जवळपास अंतिम झाले आहे. त्यादृष्टीने चर्चेच्या फेऱ्याही सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत बैठकीस चर्चेस सुरुवात करण्यात आली. आज राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिवसेनेचे महानगरप्रमुख किरण काळे व काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्यामध्ये बैठक झाली.

विद्यमान परिस्थितीत राष्ट्रवादीकडे विद्यमान नगरसेवक सध्या कोणीही राहिलेले नाहीत. ठाकरे गटाकडेही विद्यमानांपैकी केवळ एकच नगरसेवक राहिलेला आहे तर काँग्रेसकडेही एकच नगरसेवक राहिलेला आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेतील फुटीनंतर या पक्षाचे सर्व नगरसेवक अनुक्रमे अजित पवार गट व शिंदे गटात सहभागी झालेले आहेत. काँग्रेसच्या पाचपैकी चार नगरसेवक इतर पक्षांमध्ये विखुरले गेले आहेत.

महायुती व महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकी प्रमुख तीन पक्ष वगळता इतरही समविचारी पक्ष सहभागी आहेत. अद्याप त्यांच्याबाबत कोणते धोरण अवलंबवायचे याचा निर्णय झालेला नाही.