महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दरवर्षी शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा करतात. यावर्षीच्या दीपोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपा-शिंदे गटात महायुती होणार असल्याचं बोललं जात आहे.

या घटनाक्रमानंतर ‘रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीबाबत स्पष्ट विधान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या कार्यक्रमाला गेले असले तरी, राज ठाकरे महायुतीत येणार नाहीत. तसेच राज ठाकरेंची महायुतीत बिलकूल आवश्यकता नाही, असं विधान रामदास आठवलेंनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- “…या लोकांना मी सोडणार नाही” शिंदे-फडणवीसांच्या आदेशाचं पालन करणार म्हणत रवी राणांचा इशारा!

आगामी महायुतीबाबत विचारलं असता रामदास आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कार्यक्रमाला गेले होते. पण राज ठाकरे महायुतीत किंवा एनडीएमध्ये येणार नाहीत. एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आमंत्रित केलं होतं. त्यामुळे एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास काहीही हरकत नाही.

हेही वाचा- “साहेब, तुम्ही दोनदा स्वप्नात आलात” असं कार्यकर्त्याने सांगताच शरद पवारांनी विचारला भन्नाट प्रश्न, म्हणाले…

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज ठाकरेंच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, म्हणजे भाजपा-शिंदे गटाची मनसेसोबत महायुती होणार आहे, असं अजिबात नाही. आम्हाला मनसेची बिलकूल आवश्यकता नाही. भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ एकत्र असल्याने मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवायला अजिबात अडचण येणार नाही. त्यामुळे राज ठाकरेंची महायुतीत आवश्यकता नाही, असं स्पष्ट विधान रामदास आठवलेंनी केलं आहे.