सध्या महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यांवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या वादात आता रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरे हे सातत्यानं त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत, अशा शब्दांत आठवले यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

वास्तविक भगवा रंग हा शांतीचा आणि वारकरी सांप्रदायाचा रंग आहे. ही बाब राज ठाकरेंनी लक्षात घ्यावी. त्यांच्या भोंग्यासंबंधित भूमिकेशी आपण अजिबात सहमत नाही, असंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे. रामदास आठवले सध्या सोलापूर दौर्‍यावर आहेत. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. अशात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केली. तसेच मशिदीसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालीसा वाचण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. भोंग्यांचा प्रश्न सामाजिक नसून धार्मिक स्वरूपाचा आहे. धर्माचा बुरखा पांघरून कोणी संविधानाविरोधात काम करत असेल तर त्यांना आमचा विरोध असेल, असे आठवले म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, “सोलापुरात मुस्लीम समाजाचे मला एक निवेदन मिळालं आहे. पोलीस बळजबरीने मशिदीवरील भोंगे काढायला लावत आहेत. पोलिसांनी अशी भूमिका घेऊ नये. कायद्याची अंमलबजावणी जरूर करावी. धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवताना समान भूमिका प्रशासनाकडून घेतली पाहिजे.”

राज ठाकरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये घेण्याची गरज नाही. मोदी सरकारबरोबर रिपाइं असताना राज ठाकरे यांची राओआमध्ये गरजच काय? असा सवालही आठवले यांनी यावेळी उपस्थित केला. ओबीसी आरक्षणाबाबत बोलतना आठवले म्हणाले की, ओबीसी आरक्षण असो किंवा मराठा आरक्षण असो, राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यास अपयशी ठरलं आहे. वाढत्या महागाईला राज्य सरकारही जबाबदार आहे, असा आरोपही आठवले यांनी यावेळी केला. इंधनावरील कर राज्य सरकारने कमी केले तर महागाई कमी होईल. तसेच केंद्र सरकारनेही राज्य सरकारची जीएसटीची थकीत देय रक्कम टप्प्या-टप्प्याने का होईना, पण लवकर द्यावी, असंही मत त्यांनी मांडलं.