रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत भाष्य केलं आहे. राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट आहेत, त्यांनी आपला पक्ष वाढवावा. त्यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा वाढवू नये. मशिदीवरील भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील, याचा विचार राज ठाकरे यांनी करावा, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला. ते सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरेंच्या गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या भाषणावर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले, “राज ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. ते गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट आहेत. त्यांनी मुंबईतील विद्युत रोषणाईला डान्सबार म्हणणं योग्य नाही. देशातील विविध शहरांत अशाप्रकारे लाईट लावलेली आपल्याला पाहायला मिळते. मुंबईला सुंदर करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्याला डान्सबार बोलणं योग्य नाही.”

हेही वाचा- रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर, तर राहुल गांधींना दिला ‘हा’ सल्ला; नेमकं काय म्हणाले?

“राज ठाकरेंनी आता पुन्हा भोंग्यांचा विषय काढू नये. त्यांनी आपला पक्ष वाढवावा. आपले उमेदवार निवडणूक आणण्याचा प्रयत्न करावा. राज ठाकरे आता भोंग्याला विरोध करत आहेत. पण सुरुवातीला त्यांनी आपल्या झेंड्यात हिरवा, निळा आणि भगवा रंग लावला होता. आता त्यांनी भोंग्यांच्या विरोधात बोलणं योग्य नाही. त्यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे लावायला हरकत नाही. त्यांनी मुस्लिमांच्या भोंग्याला विरोध करू नये. ते परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षांपासून मशिदीवर भोंगे लावत आहेत,” असंही रामदास आठवले म्हणाले.

मनसेला महायुतीत घेण्याबाबत रामदास आठवले पुढे म्हणाले, “राज ठाकरे यांनी चांगलं काम करावं. आपला पक्ष वाढवावा. पण आगामी निवडणुकीत रिपाइं शिवसेना आणि भाजपाबरोबर असल्याने राज ठाकरेंची महायुतीत आवश्यकता नाही. आमच्या युतीत राज ठाकरेंना घेऊन चालणार नाही. यामुळे भाजपाची राष्ट्रीय पातळीवर अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना महायुतीत घेण्याची गरज नाही, असं माझं मत आहे.”