आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा रिपाईचे नेते सचिन खरात यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या वक्तव्याबाबत सावंतांना कडक समज द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा – मुंब्रा, कल्याण आणि भिवंडी भागातून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी घेतले ताब्यात

नेमकं काय म्हणाले सचिन खरात?

“तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलताना अत्यंत चुकीचं विधान केलं आहे. या विधानामुंळे मराठा समाजात संतापाची लाट आहे. या विधानाचा रिपाई (खरात) पक्षाकडून निषेध करतो. तानाजी सावंत यांनी लक्षात ठेवावे, की घटनेने प्रत्येक नागरिकांला आपल्या मागण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी या वक्तव्याबाबत सावंतांना कडक समज द्यावी, अशी आमची मागणी आहे. तसेच तानाजी सावंत यांच्या मेंदूचे अलाईनमेंट करा, अशी मागणीही आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करत आहोत”, अशी प्रतिक्रिया सचिन खरात यांनी दिली आहे.

हेही वाचा – रायगडावर पिंडदान करण्यात गैर काय ; हिंदूत्ववादी संघटनांचा सवाल

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले होते?

“रविवारी उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावंत यांची मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना जीभ घसरली होती. मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्ष तुम्ही गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. मात्र, आता पुढील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकाऊ आरक्षण मिळवून देतील”, असे ते म्हणाले.