Nagpur Engineer Kerala Missing Case: केरळच्या कोचीमध्ये विपन्नावस्थेत भटकणारा ३७ वर्षीय राष्ट्रपाल मनोहर चहांदे आता चार वर्षांनी घरी परतणार आहे. आपल्या घरापासून १,६०० किमी दूरवर केरळमध्ये अतिशय बिकट अवस्थेत जगणाऱ्या राष्ट्रपालला पूर्वआयुष्याचा काहीसा विसर पडला होता. त्याला फक्त अहिल्यानगरमधील महाविद्यालयीन जीवन आणि मुंबईत केलेली नोकरी आठवत होती. एकाकीपणाने ग्रासल्यानंतर काहीसा नैराश्यात गेलेल्या राष्ट्रपाल चार वर्षांनी त्याच्या कुटुंबीयांना कसा भेटला? केरळ पोलिसांनी यात कशी भूमिका बजावली? याची कहाणी प्रेरणादायी तर आहेच, पण त्याला मानवतेची झालरही आहे. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
कोचीच्या बेटावर वास्तव्य
महिन्याभरापूर्वी कोचीच्या एका मलावुकडू बेटावरील पोलिसांना राष्ट्रपाल अतिशय विपन्न आणि विस्कटलेल्या अवस्थेत आढळला होता. तहान भागवण्यासाठी दिवसातून काही वेळा तो पोलीस ठाण्यातील पानपोईकडे येत असे. दिवसा कुणीतरी अन्न देईल, या आशेवर तो दिवस ढकलत होता. तर रात्रीच्या अंधारात बेटावरील एका निर्जन इमारतीत कुडकुडत जगत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नैराश्यामुळे त्याच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला होता.
“तो पोलीस ठाण्यात पाणी पिण्यासाठी येत असल्यामुळे त्याचा आमच्याशी हळूहळू परिचय वाढला. सुरुवातीला त्याच्याशी बोलायला सुरुवात केल्यानंतर त्याला काहीच आठवत नव्हते. मात्र कालांतराने त्याने आमच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. आम्ही त्याला मानसोपचाराकडे घेऊन गेलो. त्यांनी सांगितले की, राष्ट्रपालला कोणताही मोठा आजार नव्हता. त्यालाही स्थिर व्हायचे होते”, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक थॉमस पालन यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.
अभियांत्रिकीचे शिक्षण आणि दरमहा १ लाख रुपये पगार
पोलिसांनी दाखवलेल्या आपुलकीमुळे चहांदे हळूहळू मोकळा होऊ लागला. त्याने सांगितले की, त्याने अहिल्यानगरमधील महाविद्यालयातून अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईतील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत तो नोकरी करत होता. इथे त्याला दरमहा १ लाख रुपयांचे वेतन होते. आई-वडिलांचे निधन आणि तीन बहिणींच्या लग्नानंतर तो एकाकी पडला होता. एकाकीपणातून तो नैराश्यात गेला.
२०२२ साली राष्ट्रपालने घर सोडले आणि तो दक्षिण भारतात गेला. तमिळनाडूमधील अनेक ठिकाणी फिरल्यानंतर तो केरळमध्ये पोहोचला. चार वर्षांपासून तो या दोन राज्यांत होता. यावर्षी जुलै महिन्यात तो कोचीत पोहोचला.
अस्खलित इंग्रजीत संवाद
पोलिसांनी पुढे म्हटले, “राष्ट्रपाल अस्खलित इंग्रजीत बोलतो. पोलीस ठाण्यातील आमच्यापैकी कुणी ना कुणी त्याच्याशी रोज बोलत असे. तो कालांतराने शांत झाला आणि आमच्याशी भरभरून बोलू लागला होता. अहिल्यानगरमधील व्हीके पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने शिक्षण घेतले असल्याचे सांगितले. नागपूरमध्ये एका गावात तो रहात होता. आम्ही अहिल्यानगरमधील महाविद्यालयाशी संपर्क साधला आणि त्याचा फोटो दाखवून माहिती मिळवण्याच प्रयत्न केला. आम्हाला त्याच्या एका नातेवाईकाचा संपर्क क्रमांक मिळाल्यानंतर कुटुंबाला शोधण्यात यश आले.”
थॉमस पल्लन म्हणाले, रस्त्यावर आढळणाऱ्या लोकांना आम्ही न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे सादर करतो. त्यानंतर त्यांना वेड्याच्या इस्पितळात किंवा निवारा गृहात नेले जाते. अशावेळी त्या व्यक्तीची कुटुंबाशी भेट होणे अवघड होते. मात्र या प्रकरणात आम्ही वेगळा प्रयत्न केला. आमच्या पातळीवरच त्याच्या कुटुंबीयांना शोधून काढण्याचा आमचा प्रयत्न होता. जो यशस्वी झाला.
राष्ट्रपालच्या कुटुंबाने २०२२ साली नागपूरमधील पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. चार वर्षांनी त्याची आणि कुटुंबीयांची या आठवड्यात भेट झाली. बहीण प्रियांका, एक मेव्हणे अमन रामटेके आणि आत्या रेखा यांच्या ताब्यात राष्ट्रपालला देण्यात आले. कुटुंबीयांनी सांगितले की, बेपत्ता होण्यापूर्वी राष्ट्रपाल महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत दोन वर्ष नोकरी करत होता. तो कुठे गेला, याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. केरळ पोलिसांनी लक्ष दिले नसते तर त्याची भेट अवघड होती.
