माझ्या कारवर ट्रक चढवला होता, पण मी वाचलो. हा संघाचा कार्यक्रम असल्याने मी याबाबत भाष्य करणार नाही, असे सांगत विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवारपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत संघाशी संबंधित ३५ संघटनांचे १,५०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. शुक्रवारी सकाळी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया हे या अधिवेशनासाठी नागपूरमध्ये पोहोचले. कार्यक्रमस्थळी तोगडिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘माझ्या गाडीवर ट्रक चढवला होता. पण मी वाचलो. ही संघाची जागा असल्याने इथे फार बोलणार नाही’, असे त्यांनी सांगितले.

प्रवीण तोगडिया हे दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये कार अपघातातून थोडक्यात बचावले होते. कारला एका ट्रकने मागील बाजूने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. सुरतमधील कामरेज भागात ही घटना घडली होती. हा केवळ अपघात नसून गुजरात सरकारने माझ्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप तोगडियांनी केला होता. या पार्श्वभूमीवर तोगडिया यांनी पुन्हा एकदा सूचक वक्तव्य करत भाजपावर टीकास्त्र सोडले.

दरम्यान, रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात आजपासून सुरु झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत बोली व भाषा याबाबत प्रस्ताव येणार आहे. देशातील विविध प्रांतातील बोली भाषांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात येईल, अशी माहिती सहसरकार्यवाह डॉ कृष्णगोपाल यांनी दिली.

दर तीन वर्षांनी होणाऱ्या प्रतिनिधी सभेत सहकार्यवाहची नियुक्ती केली जाते. यावेळी सहकार्यवाह बदलणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. १० मार्चला प्रतिनिधी सभेत सर्वसंमतीने निर्णय होईल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी सांगितले.

प्रतिनिधी सभेसाठी संघाचे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी नागपुरात पोहोचले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राम माधव आज (शुक्रवारी) संध्याकाळी नागपुरात येणार आहेत. त्रिपुरामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळा आटोपून हे नेते नागपूरकडे रवाना होतील. शनिवारी दिवसभर ते प्रतिनिधी सभेत उपस्थित राहणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमनसिंह यांच्यासह त्रिपुरा आणि नागालँडचे मुख्यमंत्री या प्रतिनिधी सभेला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रतिनिधी सभेनंतर अमित शहा आणि तोगडिया यांच्यात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चर्चेनंतर तोगडिया आणि भाजपामधील दुरावा कमी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.