राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशातील ड्रग्जचं व्यसन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट, वेबसीरिजवरून हल्लाबोल केलाय. नागपूरमधील विजय दशमीच्या भाषणात भागवत यांनी देशातील वाढत्या ड्रग्जच्या व्यसनावर चिंता व्यक्त केली. तसेच सरकारला ड्रग्ज व्यसनांचं पूर्ण निर्मूलन करावं लागेल, असं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील निर्मितीवरही निशाणा साधला. त्यावर नियंत्रणाची मागणी केली. ते दसऱ्यानिमित्त नागपूरमध्ये बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह इस्राईलचे वाणिज्यदूत कोब्बी शोशानी देखील हजर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहन भागवत म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या आधारावर नवनव्या गोष्टी येत आहेत. या गोष्टी आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रण नाहीये. तेथे कशाप्रकारचे चित्रपट येतात, काय काय येतं? आता करोना काळात तर लहान मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल आलाय. ऑनलाईन काय पाहायचं, काय नाही याचं काहीच नियंत्रण नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय दाखवायचं याचंही नियंत्रण नाही.”

“देशात ड्रग्जसह वेगवेगळ्या नशेचं व्यसन वाढत आहे”

“देशात वेगवेगळ्या नशेचे पदार्थ येतात त्याचं व्यसन वाढत आहे. ते कसं रोखायला हवं हे माहिती नाही. उच्च वर्गापासून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत भयंकर व्यसनाचं प्रमाण आहे. या नशेच्या पदार्थांच्या व्यापारातून आलेला पैसा कुणाच्या हातात जातो हे सर्वांना माहिती आहे. देशविरोधी कामात त्याचा उपयोग होतो. सीमेपलिकडील देश या नशेच्या पदार्थांच्या व्यापाराला प्रोत्साहन देतात. असं सर्व सुरू आहे,” असं भागवत यांनी सांगितलं.

हेही वाचा : “भारताचेच दोन राज्यांचे पोलीस एकमेकांविरोधात गोळ्या झाडत युद्ध करतात”, मोहन भागवतांकडून तीव्र नाराजी व्यक्त

“ड्रग्ज व्यसनाचं पूर्ण निर्मूलन सरकारला करावं लागेल”

यावेळी मोहन भागवत यांनी बिटकॉईनवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “बिटकॉईन सारखं चलन आहे. त्यावर कोणत्या राष्ट्राचं नियंत्रण आहे हे मला माहिती नाही. त्यात स्पर्धा तयार होतेय. या सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवणं, समाजाच्या हितासाठी चालवणं, ड्रग्ज सारख्या व्यसनाचं पूर्ण निर्मूलन होईल यासाठी प्रयत्न सरकारने करायला हवेत. त्यांना हे करावं लागेल. परंतु शासन त्यांचं काम आज नाही उद्या करेल. तसं करण्याचा प्रयत्न करतही आहे. ते आज ना उद्या यशस्वी होतील. परंतु मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. समाजाचं मन तयार व्हायला पाहिजे. बालकाचं मन घरात तयार होतं.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat comment on drugs addiction in india and ott platform pbs
First published on: 15-10-2021 at 11:07 IST