Mohan Bhagwat on Reservation statement Gen Z interaction: दिल्लीच्या जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थी आंदोलन करत असताना दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर ‘आरक्षण हटावो’ मोहीम सुरू करण्यात आली होती. एकूणच सध्या तरूणांमध्ये आरक्षणाबाबत विविध विचार प्रकट केले जात आहेत. याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, “देशात जोपर्यंत सामाजिक भेदभाव आणि विषमता अस्तित्वात आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे.”
मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र येथे ‘इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशन्श’च्या १५ व्या वर्धापन दिन सोहळ्यात डॉ. मोहन भागवत यांनी हजेरी लावली होती. देशभरातून आलेल्या जेन-झी आणि जेन-अल्फा पिढीतील २,००० तरुणांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. आयआयएमयूएनचे संस्थापक ऋषभ शाह यांनी यावेळी डॉ. मोहन भागवत यांना जंतर-मंतरवरील आंदोलन, आरक्षण आणि तरुणांना भेडसावणाऱ्या समस्यांचे अनेक प्रश्न विचारले.
शिक्षण आणि नोकरीमध्ये असलेले आरक्षण आता कमी करण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न ऋषभ शाहने विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. मोहन भागवत यांनी थेट हो किंवा नाही असे उत्तर देण्यास नकार दिला. आरक्षणाकडे आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनातून पाहायला हवे. जोपर्यंत समाजात सामाजिक भेदभाव अस्तित्वात आहे. तोपर्यंत आरक्षण आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
Mumbai, Maharashtra: On the reservation, RSS Chief Mohan Bhagwat says, "I will not answer you directly. I will ask you to go to what Dr. Babasaheb Ambedkar thought about reservation. If honestly we follow his advice, then there is no problem. Reservation exists due to social… pic.twitter.com/dQ9JQjxdKc
— IANS (@ians_india) August 6, 2026
“मात्र ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधली आहे, त्यांनी स्वतःहून औदार्य दाखवत आरक्षणाचा लाभ सोडायला हवा, जेणेकरून समाजातील इतर गरजूंना त्याचा फायदा मिळू शकेल”, असेही डॉ. भागवत यांनी नमूद केले.
आरक्षणाच्या संकल्पनेवर बोलताना डॉ. मोहन भागवत म्हणाले की, जर आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सल्ल्याचे प्रामाणिकपणे पालन केले, तर कोणताही वाद उरणार नाही. आरक्षणाची गरज सामाजिक कारणांमुळे निर्माण झाली आहे आणि जोवर सामाजिक विषमता आहे, तोवर आरक्षण राहील.
‘ज्यांना लाभ झाला त्यांनी स्वतःहून इतरांसाठी सोडावे’
“आरक्षणाचा लाभ मिळालेल्या वर्गाने आता इतरांसाठी मार्ग मोकळा करण्याची गरज भागवत यांनी व्यक्त केली. “ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे आणि ज्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारली आहे, त्यांनी औदार्य दाखवून ते सोडून दिले पाहिजे,” असे विधान भागवत यांनी यावेळी केले. तसेच आरक्षण लाभार्थ्यांच्या काही घटकांमध्ये आता असा विचारप्रवाह हळूहळू तयार होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयानेही उप-वर्गीकरणाबाबत दिलेल्या निर्देशांचा उल्लेख करत ते म्हणाले की, आरक्षणाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचावा, ही भावना आता प्रबळ होत आहे.
आरक्षणावरून होणाऱ्या राजकारणावर टीका
आरक्षणाच्या मुद्द्यावरून होणाऱ्या राजकीय समीकरणांवर आणि वादांवर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नाराजी व्यक्त केली. “आरक्षण ही मुळात सामाजिक एकतेसाठी आणलेली व्यवस्था होती. ही संकल्पना किंवा उपाययोजना चुकीची नाही; परंतु ज्यांच्या हातात ही तलवार आहे, ते ती चुकीच्या पद्धतीने आणि जाणीवपूर्वक चालवत आहेत. जोपर्यंत ही राजकीय दृष्टी बदलत नाही, तोपर्यंत चित्र बदलणार नाही,” अशी टीका त्यांनी केली. कल्याणकारी योजनांची प्रामाणिक अंमलबजावणी झाल्यास आरक्षणाची गरज लवकर संपुष्टात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
