Mohan Bhagwat Three Children Statement: सर्वसाधारणपणे ७५ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीने पदावर न राहता कार्य करीत रहावे, अशी आमची सर्वसाधारणपणे भूमिका आहे. त्यामुळे माझ्या वयाची ७५ वर्षे झाल्यावर मी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यावर मला संघ कार्यकर्त्यांनी पदावर राहण्याचा आग्रह केल्याने मी अजून पदावर आहे. संघ सांगेल, तेव्हा पदावरुन दूर होईन, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी वरळीतील नेहरु सेंटरमध्ये केले. हिंदूनी तीन अपत्यांना जन्म द्यावा, असे मतही भागवत यांनी व्यक्त केले.

‘ संघ प्रवासाची १०० वर्षे, नवे क्षितीज ’ कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी संघ कार्य, विचार व अन्य मुद्द्यांवर संघाची भूमिका मांडली आणि विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी निवृत्तीबाबतच्या प्रश्नावर भागवत म्हणाले, सर्वसाधारणपणे निवृत्तीचे वय ७५ असावे, असे आमचे मत आहे. पण पदावरुन निवृत्त झाले, तरी शरीर साथ देत असेल, तर शेवटपर्यंत समाजासाठी कार्यरत असावे. संघामध्ये निवृत्तीबाबतचे नियम किंवा पद्धत नाही. माझ्या वयाची ७५ वर्षे झाल्यावर मी निवृत्तीचा विचार मांडला, तेव्हा तुमची तब्येत चांगली असल्याने निवृत्ती घेवू नये, अशी सूचना कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे संघाला वाटेल, तोपर्यंत मी पदावर राहीन.

सरसंघचालकपदी नियुक्ती होणारी व्यक्ती ब्राह्मणच असली पाहिजे, अशी अट नाही आणि अनुसूचित जाती-जमातीचे असणे, ही अपात्रता नाही. त्यामुळे सरसंघचालक हे हिंदू आणि काम करणारे असले पाहिजेत, एवढेच पाहिले जाते. त्यांची जात बघितली जात नाही. त्यामुळे अनुसूचित जाती-जमातीची व्यक्तीही सरसंघचालक होवू शकते, असे भागवत यांनी नमूद केले.

सक्तीने धर्मांतर झालेल्यांची घरवापसी व्हावी

आपल्या देशात कोणालाही कोणताही धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे. पण सक्ती किंवा आमिष दाखवून धर्मांतर केले गेले असल्यास अशा नागरिकांची घरवापसी व्हावी, असे भागवत यांनी सांगितले. देशात होत असलेल्या बांगलादेशींच्या घुसखोरीबाबत चिंता व्यक्त करुन भागवत म्हणाले, घुसखोरांचा छडा लावून त्यांच्या परतपाठवणीचे काम सरकार गेली १० वर्षे करीत आहे. पण समाज म्हणून आपणही यावर लक्ष ठेवून अशा व्यक्तींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. देशातील नागरिकांना रोजगार मिळेल, याची काळजी आपण घेतली पाहिजे. मुस्लिम, ख्रिश्चन आदींना सुधारण्याच्या भानगडीत पडू नका, त्यातून संघर्ष निर्माण होईल. मुस्लिम, ख्रिश्चन आदी धर्मांमधील मूळ अध्यात्म हे मानवतावाद व शांतता हेच असते. पण मूळ शिकवणीपासून दूर गेल्यानंतर आक्रमकपणा निर्माण होतो. त्यामुळे आपली ताकद वाढवून मुस्लिम, ख्रिश्चनांशी मैत्री करा. त्यानंतर आपण सांगितल्यास, ते ऐकतील.

तीन अपत्ये असावीत

विवाहित हिंदूंनी तीन अपत्यांना जन्म द्यावा, असे मत भागवत यांनी व्यक्त केले. मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्र व अन्य दृष्टीने तीन अपत्यांना जन्म देणे चांगले आहे, असे भागवत यांनी नमूद केले. देशाचा जननदर २.१ पर्यंत घटला असून जो आहे, याबद्दल भागवत यांनी घटत्या जनन दराबाबत चिंता व्यक्त केली. संघ ही तरुण संघटना असून कार्यकर्त्याचे सरासरी वय २८ आहे. ते २५ वर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे भागवत यांनी सांगितले. देशभरात समान नागरी कायदा लागू असला पाहिजे, असे सांगून भागवत यांनी उत्तराखंडचे उदाहरण दिले. सर्व समाजघटकांशी चर्चा करुन आणि संवाद साधून तेथे समान नागरी कायदा आणण्यात आला. त्यामुळे संघर्ष झाला नाही. त्याचे अनुकरण इतरांनी केले पाहिजे, असे भागवत यांनी नमूद केले. माध्यमिक शिक्षणात आगामी शैक्षणिक वर्षापासून मूल्यशिक्षण व अन्य काही बदल होत आहेत. पण केंद्रातील सरकार वेगळ्या पक्षाचे आणि राज्यातील अन्य पक्षाचे अशी स्थिती काही ठिकाणी असल्यामुळे राज्य सरकारांनी विरोध केला, तर त्या धोरणाच्या अंमलबजावणीत अडचणी येतील, असे त्यांनी सांगितले.

संघाची कामकाजाची भाषा इंग्रजी होणार नाही

संघाची नियमित कामकाजाची भाषा कधीही इंग्रजी होणार नाही, असे भागवत यांनी स्पष्ट केले. इंग्रजी भाषा उत्तम बोलता-लिहीता आली पाहिजे. पण संघातील कामकाजाची भाषा ही मातृभाषा किंवा हिंदी असली पाहिजे, असा आमचा कटाक्ष आहे. काही राज्यांमध्ये किंवा अन्य देशांमध्ये जेथे हिंदी किंवा अन्य भाषा समजणारे नसतील, त्यांच्यासाठी इंग्रजीतून संवाद साधला जातो. पण इंग्रजी ही भारतीय भाषा नसल्याने आमचा भर हा मातृभाषा व हिंदीवरच असल्याचे भागवत यांनी सांगितले.