RSS statement on CJP Protest and Abhijeet Dipke: कॉक्रोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे घेतलेले आंदोलन विविध अंगांनी चर्चेचा विषय ठरत आहे. या आंदोलनाला मिळालेला जेन-झींचा पाठिंबा. त्यातून नव्या पिढीच्या महत्त्वाकांक्षा, त्यांचे विचार, त्यांची अभिव्यक्ती दिसली. विरोधक या आंदोलनाकडे पाहून आपली रणनीती ठरवत आहेत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या आंदोलनाकडे वेगळ्याच नजरेने पाहत आहे. संघाचे संयुक्त महासचिव अतुल लिमये यांनी या आंदोलनाला घटनाबाह्य आणि राष्ट्रविरोधी म्हटले.

कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके हा ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारा आहे, त्याच जिल्ह्यात अतुल लिमये यांनी सीजेपीच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना लिमये यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाबाबतची निरीक्षणे नोंदवली.

लिमये म्हणाले की, नीट पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांची सुरुवातीची प्रतिक्रिया उत्स्फूर्त होती. मात्र सीजेपीच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन हा एका मोठ्या राजकीय उद्दिष्टांचा भाग होते. या आंदोलनाच्या माध्यमातून डाव्यांनी पर्यायी राजकारणाच्या संकल्पनेची यशस्वी चाचणी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘ग्रामर ऑफ अनार्की’ या ऐतिहासिक भाषणातील काही ओळींचा संदर्भ देत लिमये म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी फार पूर्वीच अराजकतावाद्यांबद्दल इशारा दिला होता. आता हे उलगडण्याची, समजून घेण्याची आणि अशा अराजकतावादी शक्तींपासून राष्ट्राला वाचविण्यासाठी खबरदारी घेण्याची वेळ आली आहे.

“नीट पेपरफुटीमुळे सुरू झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन हे शिक्षण व्यवस्थेतील चुका सुधारण्यासाठी होते. मात्र नंतर हे आंदोलन चुकीच्या लोकांच्या हाती लागले”, असे लिमये यावेळी म्हणाले. विद्यार्थी हे शक्यतो राष्ट्रीय हिताच्या बाजूने झुकलेले असतात, हे सांगताना लिमये पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या शक्तीला योग्य दिशेने वळवणे महत्त्वाचे आहे. अभाविपने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांची ऊर्जा राष्ट्रउभारणीच्या कार्याकडे वळवली पाहिजे.”

cjp abhijit dipak demand amit shah should resign
CJP च्या अभिजीत दिपकेंची मागणी; “अमित शाह यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, कारण…”

सीजेपीच्या वैचारिक पाठिंब्यावर प्रश्नचिन्ह

जंतर-मंतरवरील आंदोलनाचा बारकाईने अभ्यास करत त्याचे विश्लेषण करण्याचे आवाहन लिमये यांनी यावेळी केले. “कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे एक केस स्टडी म्हणून पाहिले पाहिजे आणि त्याचे विश्लेषण करायला हवे. सीजेपीचा उदय, त्याची कार्यपद्धती, त्यांना मिळालेले समर्थन आणि वैचारिक पाठिंब्याचे तपशील समजून घ्यायला हवेत”, असेही लिमये म्हणाले.

लिमये यांनी पुढे म्हटले की, सीजेपीचा संस्थापक अभिजीत दिपके भारतात परतल्यानंतर त्यांनी देशव्यापी दौरा केला होता. त्यात त्यांना जास्त पाठिंबा मिळाला नव्हता. मात्र २० जूननंतर आंदोलनाला पाठिंबा वाढला. मोठ्या संख्येने लोक गर्दी करू लागले. दिपके भारतात येण्याचा काळ आणि २० जून याच्या दरम्यान नेमके काय झाले? आंदोलनाची दिशा कशामुळे बदलली आणि कोणत्या यंत्रणा त्यात सामील झाल्या? याचा उलगडा व्हायला हवा.

कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देणाऱ्या संघटनांवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, त्या बहुतांशी डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या होत्या. या संघटनांनी भारत तेरे तुकडे तुकडे सारख्या घोषणा यापूर्वी दिल्या होत्या, असे लिमये यावेळी म्हणाले.

योगेंद्र यादव यांच्या विधानाची नोंद घ्यावी

राजकीय भाष्यकार योगेंद्र यादव यांची या आंदोलनाबाबतची प्रतिक्रिया समजून घ्यायला हवी, असेही लिमये म्हणाले. “योगेंद्र यादव म्हणाले होते की, लोकशाहीचे भविष्य संसदेत नाही तर रस्त्यावर ठरेल. तसेच निवडणुका नाही तर आंदोलने देशाची दिशा ठरवतील. या विधानांचा अर्थ उलगडून पाहायला हवा”, असेही ते म्हणाले.

याशिवाय लिमये यांनी काही विद्यार्थी आंदोलकांच्या भाषेबद्दल आणि वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली. डाव्या संघटनांनी आंदोलनाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आंदोलनाने उद्दिष्ट गमावले होते, असेही ते म्हणाले.