सरसंघचालक मोहन भागवत हे येत्या रविवारी २६ एप्रिल रोजी स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. मोहन भागवत हे संध्याकाळी पाच वाजता ऑनलाइन माध्यमाद्वारे स्वयंसेवकांशी संवाद साधतील. ‘सद्यस्थिती आणि आमची भूमिका’ या विषयावर ते स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूरच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. “सध्या संपूर्ण देश करोना व्हायरसच्या संकटाला सामोरा जात आहे. हे संकट अतिशय गंभीर असलं तरी समाजाकडून मिळणारा प्रतिसादही उत्तम आहे. या संकटकाळात भारत हा संपूर्ण जगासमोर एक उत्तम उदाहरण म्हणून उभा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकदेखील एकत्र येत समाजाप्रती आपलं योगदान देत आहेत. सद्य परिस्थिती ध्यानात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूरच्या वतीनं अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत हे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील,” असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात आलं आहे.