रेती माफियांकडून आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण, विवस्त्र करून केली मारहाण!

तिघांना अटक, नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल; मारहाणीनंतरचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर केला व्हायरल

Three suspected terrorists arrested
दक्षिण कोलकातामधील हरिदेवपूर भागातून तिघांना अटक करण्यात आली आहे. (संग्रहीत छायाचित्र)

यवतमाळ जिल्ह्यात राजकीय, प्रशासकीय यंत्रणेच्या पाठबळामुळे रेती माफियांचा हैदोस वाढल्याचे दिसत आहे. यामुळेच बुधवारी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याचे (आरटीआय) सिनेस्टाईल अपहरण करून त्याला ओलीस ठेवत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढच नाही तर समाजात आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये दहशत पसरावी म्हणून या कार्यकर्त्यास विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर देखील व्हायरल करण्यात आला आहे. गुरूवारी रात्री संबंधित कार्यकर्त्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली.

याप्रकरणी चंदन सुदाम हातागडे (वय -३५) रा.नेताजीनगर, यवतमाळ याने गुरुवारी रात्री यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत सांगितले आहे की, ”बुधवारी तो आपला भाऊ विकाससोबत दुचाकीने भोसा येथे मित्राला भेटायला गेला असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील युवक समीर राजा याने मोबाइलवरून फोन केला व आपल्याला बोलण्यासाठी दिला. तेव्हा शगीर मिस्त्रीने अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळातच तिथे चारचाकी वाहन आले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दोन्ही भावांना वाहनात बसविले, मोबाइल हिसकावून घेतले. त्यानंतर पांढरकवडा मार्गावरील उड्डाण पुलानजीकच्या एस. एम. कन्स्ट्रक्शन येथे नेले. तेथे जबर मारहाण करण्यात आली. खिशातील २८ हजार रूपये काढून घेण्यात आले. विवस्त्र करून नग्न अवस्थेतील व्हिडिओ बनविला व प्रसारित केला. या मारहाणीत आपण दोन वेळा बेशुद्ध झालो. त्यानंतर आपल्याला शुद्धीवर आणण्यात आले. जातीवाचक शिवीगाळ केली गेली. त्यानंतर मारहाण करणारे सर्वजण तेथून पसार झाले”.

पोलिसांनी याप्रकरणी मोहम्मद शगीर मोहम्मद अन्सारी (४५), रा.पॉवरहाऊस, पांढरकवडा रोड, समीर राजा (२६), शगीरचा भाऊ सलीम अन्सारी (३९). सचिन महल्ले (४३), अतुल शामराव कुमटकर (३८), रा. तलावफैल, छोटू भांदक्कर (४०), रा. टिळकवाडी, शाज अहेमद नजीर अहेमद (३६), अजय श्रीराम गोलाईत (३९), कादर याचा भाऊ मन्सूर अशा नऊ जणांविरूद्ध भादंविच्या ३६५, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२४, ५०४, ५०६ तसेच अॅट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मोहम्मद शगीर मोहम्मद अन्सारी, शाज अहेमद नजीर अहेमद आणि अजय गोलाईत या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी दिली.

जिल्ह्यात रेती तस्कारांमध्ये प्रचंड स्पर्धा असून यातून गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या आहेत. त्यांनी आपापले परिसर वाटून घेतले आहे. शिवाय उपसा करून आणलेली रेती शहरात अनेकांना दमदाटी करून मोकळ्या जागेत साठविण्यात येत असल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत. या रेती तस्कारांना सत्ताधारी पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांचेही पाठबळ असल्याने, आता पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ हे नेमकी काय कारवाई करतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हा कथित माहिती अधिकार कार्यकर्ता माहितीच्या आधारे रेती माफियांना ब्लॅकमेलिंग करीत असल्याने त्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे.

नायब तहसीलदारांवरही रेती तस्कारांचा चाकूहल्ला –
जिल्ह्यात पैनगंगा, वर्धा, अडाण, बेंबळा या मोठ्या नद्या असून त्यातून रेती उपशासाठी प्रचंड स्पर्धा आहे. यातूनच रेती माफियांच्या अनेक टोळ्या जिल्ह्यात अस्तित्वात आल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी उमरखेड येथील नायब तहसीलदारांवर रेती तस्कारांनी जीवघेणा चाकूहल्ला केला होता, घाटंजी येथे तहसीलदारांच्या निवासस्थानासमोरील वाहन पेटवून दिले होते. माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या अपहरण व माहरणीमुळे रेती तस्कारांच्या कारवाया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rti activist abducted by sand mafia beaten up msr

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या