मुंबई : वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्या वाहन चालकाला दंड ठोठावताना आपल्या गाडीवरील चालकाला फोटो काढायला लावणे वाहतूक पोलीस निरीक्षकांना चांगलेच महागात पडले. स्वत:ची जबाबदारी आपल्या वाहनचालकावर सोपविल्याप्रकरणी वाहतूक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्यावर गृह विभागाने कारवाई केली असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. अशा प्रकारे झालेली ही पहिलीच कारवाई आहे.

वाहतूकीचा नियमभंग केलेल्या चालकांच्या वाहनाचा नंबर प्लेटचा फोटो मशीनद्वारे काढण्यात येतो. या मशीनद्वारेच ई चलान आकारले जाते. मात्र या मशीनद्वारे ई चलन दंड आकरण्याचे अधिकार केवळ वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनाच आहे. मात्र मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील यांनी देवनारमध्ये कार्यरत असताना त्यांनी आपल्या वाहनचालकाच्या हे ई चलन मशीन ताब्यात दिले. या वाहन चालकाकडून ई चलन मशीनवरून समोरील वाहतूक मोडणाऱ्या वाहनाचा फोटो काढतानाची चित्रफीत समाजमाध्यमांवर सर्व ठिकाणी प्रसिद्ध झाली. त्याचप्रमाणे याविषयीचे वृत्तही वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले.

गृह विभागाने याची गंभीर दखल घेतली. या प्रकारामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली असून महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तवणूक) नियमांचा भंग करणारी आहे असा ठपका ठेवत मोटार वाहन निरिक्षक सचिन पाटील यांच्यावर परिवहन आयुक्तांनी निलंबानाची कारवाई केली आहे. निलंबनाच्या काळात त्यांना कोणतीही खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही असे आदेशात नमूद केले आहे. त्यांनी खासगी नोकरी केल्यास त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा गृह विभागाने दिला आहे.

खासगी मोबाईलने फोटो काढले तरी कारवाई

वाहतूक विभागाच्या पोलीसांना ई चलन मशीनद्वारेच फोटो काढणे बंधनकारक आहे. मात्र बऱ्याचदा मोबाईलमधून फोटो काढून मग तो मशीनवर घेतला जातो. बऱ्याचदा मोबाईलवर फोटो दाखवून संबंधित वाहनचालकासोबत आर्थिक तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो. असे करणे बेकायदेशीर असून असे करताना आढळल्यास संबंधित वाहतूक पोलिसांवर कारवाई करण्याचा इशारा गृहविभागाकडून देण्यात आला आहे. याविषयीचे आदेश गृह विभागाने चारी केले असून असे करताना आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.