दिगंबर शिंदे

सांगली : मिरजेतील तंतुवाद्य कारागिरांनी हनुमानाच्या गदेच्या आकारातील रूद्रवीणा साकार केली आहे. या रूद्रवीणेतून उद्याच्या हनुमान जयंतीला मध्यप्रदेशतील महुआ येथील गुरू मुरारी बापू यांच्या आश्रमात संगीतस्वर उमटणार आहेत. सुवर्णवर्ख असलेली ही रूद्रवीणा तयार करण्यासाठी मिरजेतील ‘जीएस मुझिकल्स’चे युसुफ मुल्ला, झाकीर मुल्ला  आणि अल्ताफ मुल्ला यांना पाच महिन्याचा कालावधी लागला.

  पारंपरिक वाद्यनिर्मितीबरोबरच येथील कारागिरांनी तंतुवाद्यनिर्मितीमध्ये अनेक प्रयोग वेळोवेळी केले आहेत. कलाकारांना आवश्यक असणारे बदल वाद्यांमध्ये करत प्रयोगशीलता जोपासली आहे. फोल्डिंग तानपुरा, काचेचा बिलोरी हंडय़ाचा तानपुरा, शहामृगाच्या अंडय़ाचा तानपुरा यांसह पारंपरिक आणि परदेशी वाद्यांचे मिश्रण असलेली तंतुवाद्ये येथील कारागिरांनी आजवर तयार केली आहेत. प्रयोगशीलता हे या कारागिरांचे वैशिष्टय़ आहे.

मिरजेतील ‘जीएस म्युझिकल्स’च्या मुल्ला पिता- पुत्रांनीही ही प्रयोगशीलता जोपासत विविध प्रकारची तंतुवाद्ये तयार केली आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसिध्द अध्यात्मिक गुरू मुरारी बापू यांनी हनुमान गदेच्या आकारातील रूद्रवीणा तयार करण्यास मुल्ला बंधूना सांगितले. मुल्ला बंधूंनीही हे आव्हान स्वीकारले. सलग पाच महिने परिश्रम घेऊन हनुमान गदेच्या आकारातील वैशिष्टयपूर्ण रूद्रवीणा त्यांनी तयार केली. यामध्ये रूद्रवीणेच्या मुख्य भोपळय़ाला गदेचा आकार देण्यात आला. सुमारे पाच फूट उंचीची आणि २५ किलो वजनाची ही रूद्रवीणा तयार करण्यात आली. त्यावर सोनेरी वर्ख लावण्यात आला. मात्र, गदेचा आकार देताना रूद्रवीणेच्या मूळच्या वादनात फरक पडणार नाही याचीही दक्षता घेण्यात आली. मुल्ला बंधूनी तयार केलेल्या या रूद्रवीणेचे मुरारी बापूंसह अन्य नामवंत रूद्रवीणा वादकांनी कौतुक केले आहे. सोनेरी वर्ख लावलेली ही रूद्रवीणा अनेक कलाकारांच्या पसंतीस उतरली आहे.

 मिरजेत तयार झालेली ही हनुमान गदेच्या आकारातील रूद्रवीणा महुआ येथील मुरारी बापूंच्या आश्रमात विराजमान झाली आहे. हनुमानाचे एक नाव ‘रूद्र’ असेही आहे. ख्यातनाम वादक पंडिता ज्योती हेगडे या रूद्रवीणा वादन करणार  आहेत. रूद्रवीणा हे दुर्मिळ वाद्य आहे. ते वाजविणारे कलाकारही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहेत. जीएस म्युझिकल्समध्ये मुल्ला बंधू हे वाद्य गेली काही वर्षे तयार करीत आहेत.