अहिल्यानगरः श्रीरामपूर बाजार समितीतील नऊ संचालकांनी राजीनामे दिल्यानंतर सत्ताधारी गट अल्पमतात आला होता. त्यामुळे उर्वरित आठ संचालकांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यास जिल्हा उपनिबंधकांनी मनाई केली होती. मात्र, या आदेशाविरोधात सत्ताधारी गटाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली. न्यायामूर्ती रोहित जोशी यांनी सत्ताधारी आठ संचालकांना समितीचे दैनंदिन कामकाज करण्यास परवानगी देताना मोठे निर्णय मात्र घेवू नयेत, असे स्पष्ट केले.
१९ मे रोजी अभिषेक खंडागळे यांच्यासह ९ संचालकांनी घरगुती कारणांमुळे राजीनामे दिले. त्यापूर्वीच जितेंद्र गदिया यांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे संचालक मंडळाची संख्या आठवर आली. सहकार कायद्यानुसार किमान १० सदस्यांची उपस्थिती आवश्यक असल्याने, मंडळ गणपूर्तीच्या निकषांनुसार अपूर्ण ठरत होते. जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मधील कलम ४० (ई) अन्वये आदेश देत सत्ताधारी गटाला कोणतेही धोरणात्मक, प्रशासकीय किंवा आर्थिक निर्णय घेण्यास मनाई केली होती. तसेच, त्यांच्या निर्णयांना वैध मानले जाणार नसल्याचेही स्पष्ट केले होते.
याविरोधात सत्ताधारी गटाने ॲड. राहुल करपे यांच्या वतीने ॲड. महेश देशमुख यांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल केली होती. राजीनामा देणाऱ्या संचालकांनी स्वतःहून आणि घरगुती कारणांमुळे राजीनामे दिल्याचे युक्तीवादात सांगण्यात आले. दरम्यान, ६ राजीनामाधारक संचालक सुनावणीस हजर होते.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सत्ताधारी ८ संचालकांना बाजार समितीचे दैनंदिन कामकाज करण्याची परवानगी दिली. मात्र, मोठे निर्णय घेवू नयेत, असे स्पष्ट करून पुढील सुनावणी १० जूनला ठेवल्याचे ॲड. देशमुख यांनी सांगितले. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. आर. के. इंगोले, तर राजीनामा दिलेले संचालक अभिषेक खंडागळे व इतर पाच जणांच्या वतीने ॲड. अजित होन यांनी काम पाहिले.
सभापती व संचालक मंडळ पदावर बसल्यानंतर विरोधी संचालकांनी सर्वप्रकारे चौकश्या लावून पाहिल्या, पण काही उपयोग झाला नाही. शेवटचा पर्याय म्हणून राजीनाम्याचा मार्ग स्वीकारला. ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी असलेल्या या संस्थेवर जनतेने निवडलेल्या संचालकांऐवजी प्रशासकाच्या ताब्यात देण्यासाठी राजकीय कुरघोड्या सुरू होत्या. मात्र, आम्ही केलेला कारभार, समितीला झालेला नफा हा सर्वांसमोर आहे. त्यामुळे आम्हाला पायउतार करण्याच्या नादात त्यांना स्वतःलाच पायउतार होण्याची वेळ आली. –सुधीर नवले, सभापती, बाजार समिती, श्रीरामपूर.