Rohit Pawar Post on BJP Alliance Party : राज्याच्या राजकारणात अशोक खरात प्रकरणामुळे वेगळंच वळण मिळालं आहे. अशोक खरातप्रकरणामुळे सत्तेतील आणि विरोधातील अनेक नेत्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आलेलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धक्कादायक दावा केला आहे. सत्तेतील मोठ्या पक्षाकडूनच सत्तेतील मित्रांची शिकार केली जाणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. त्यांनी एक्सवरून ही पोस्ट केली आहे.

“भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे”, असं रोहित पवार म्हणाले.

खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही

पुढे त्यांनी अशोक खरात प्रकरणावरही भाष्य केलं. ते म्हणाले, महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे. आज भाजपा मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे.”

रोहित पवारांकडून खोचक सल्ला

“त्यामुळे आपलीच भाजपाकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील”, असा खोचक सल्लाही रोहित पवारांनी दिला.