लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : गावाच्या शिवारात वाघ आल्याची अफवा समाज माध्यमांतून फैलावत भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी एका तरूणाविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना शिँदे गटाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या चिकमहूद गावात हा प्रकार घडला.




शैलेश कांबळे (रा. मेटकरवाडी, महूद, ता. सांगोला) असे अदखलपात्र गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. चिकमहूद गावच्या शिवारात जाधववाडीजवळ रस्त्यावर वाघ आल्याचे खोटे आणि बनावट छायाचित्र तयार करून शैलेश कांबळे याने समाज माध्यमांवर प्रसारीत केला. याच छायाचित्राचे स्टेटसही ठेवले. त्यामुळे गाव व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आणखी वाचा-श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
हा प्रकार वन विभागाला कळताच शैलेश कांबळे याचा शोध घेण्यात आला. त्याने दिलेल्या कबुलीनुसार प्रथम त्याने जाधववाडीच्या रस्त्याचे छायाचित्र काढले आणि त्या रस्त्यावर वाघ प्रकटल्याचे बनावट छायाचित्र तयार करून ते समाज माध्यमांवरून मित्रांना पाठविले. हेच छायाचित्र स्टेटसवरही ठेवले. वनपाल सुग्रीव मुंडे यांनी यासंदर्भात सांगोला पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार कांबळे याच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.