मतदार राजा जागा हो, मतदानासाठी तयार हो, हा संदेश जिल्ह्यातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावा यासाठी रविवारी ‘रन फॉर व्होट’ या  मिनी मॅरेथॉन स्पध्रेत शेकडो सांगलीकर धावले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जागृतीच्या उद्देशाने रन फॉर व्होट – मिनी मॅरेथॉन स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते.  येथील  छत्रपती शिवाजी स्टेडियममधून रन फॉर व्होट स्पध्रेस प्रारंभ झाला.  यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह तसेच त्यांच्या पत्नी स्वाती सिंह कुशवाह, पोलीस अधीक्षक दिलीप सावंत, महापालिका आयुक्त अजिज कारचे, निवडणूक निरीक्षक आर.पी. सरोज, पी.व्ही.के. राजशेखर आदी मान्यवर उपस्थित होते.
येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाने विविध जनजागृतीचे कार्यक्रम घेतले असून रन फॉर व्होट या  मिनी मॅराथॉन स्पध्रेच्या माध्यमातून आज सांगली शहर तसेच सांगली-मिरज रस्त्यावर आज संपूर्ण सांगलीकर धावले.  यामध्ये शालेय विद्यार्थी, तरूण-तरूणी, खेळाडू तसेच ज्येष्ठांनीही सहभाग घेऊन रन फॉर वोट-वोट फॉर सांगलीचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.     
 रन फॉर व्होट – मिनी मॅरेथॉन स्पध्रेतील सर्व सहभागी खेळाडूंनी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला टी शर्ट परिधान केल्याने एक वेगळे वातावरण आणि स्पध्रेचा उत्साह द्विगुणीत झाला.  सर्वजण रन फॉर व्होट-व्होट फॉर सांगली असा संदेश देत उत्साही वातावरणात रस्त्यावरून धावत होते.  रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी रन फॉर व्होट – मिनी मॅरेथॉन स्पध्रेतील खेळाडूंना प्रोत्साहित केले. आज जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच क्रीडा संस्थांच्या खेळाडूबरोबरच नागरिकही आज मतदार जनजागृतीसाठी रस्त्यावरून धावले हीच खऱ्या अर्थाने मतदार जागृतीला मिळालेली पोहोच म्हणावी लागेल.
या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह म्हणाले, येत्या १५ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान होत असून मतदानाची ही टक्केवारी ८० टक्यापर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मतदार जागृतीचे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. रन फॉर व्होट या मिनी मॅरेथॉन स्पध्रेच्या माध्यमातून सांगलीकर धावले ही खऱ्या अर्थाने समाधानाची आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्यास मदत करणारीच घटना आहे.
जिल्ह्यात मुक्त, निर्भय आणि शांततामय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगून जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह म्हणाले, मतदारांनी येत्या १५ ऑक्टोबर रोजी मतदानाचा पवित्र हक्क बजावून भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणास सहाय्यभूत व्हावे.  मतदारांनी विचारपूर्वक, जागृतपणे मतदान करावे.  कोणत्याही दबावाला अथवा प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्रीय निवडणूक निरीक्षक पी.व्ही.के. राजशेखर याप्रसंगी बोलताना म्हणाले, भारतीय लोकशाहीत मतदारांना अनन्यसाधारण महत्त्व असून मतदारांनी येत्या विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढविण्यास मदत करावी. सांगलीतील मतदार आपले मतदान करून लोकशाहीच्या बळकटीकरणास हातभार लावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पोलीस अधीक्षक दिलीप सावंत या प्रसंगी बोलताना म्हणाले, विधानसभेची निवडणूक मुक्त, निपक्ष आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आणि पोलीस यंत्रणा दक्ष आहे.  मतदारांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रारंभी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी मान्यवरांचे स्वागत केले.  उपजिल्हा निवडणूक अधिकारी मौसमी बर्डे यांनी मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने रन फॉर व्होट – मिनी मॅरेथॉन स्पध्रेची संकल्पना विशद केली.