scorecardresearch

भररस्त्यात गाडीनं घेतला पेट, काही क्षणांत जळून खाक; वाई-पाचगणी रस्त्यावरचा धक्कादायक प्रकार!

पसरणी घाटात गाडीनं अचानक पेट घेतला आणि काही क्षणात खाक झाली.

wai pachgani pasarani ghat car burnt
पसरणी घाटात गाडीनं अचानक पेट घेतला आणि काही क्षणात खाक झाली.

वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात आज एका गाडीने अचानक पेट घेतला. थोड्याच वेळात गाडी जळून पूर्णपणे खाक झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या गाडीतून प्रवास करणारे दोघे भाऊ बहीण प्रसंगावधान राखून वेळीच खाली उतरल्याने बचावले बचावले आहेत.

नेमकं घडलं काय?

वाई – पाचगणी रस्त्यावर दत्त मंदिराजवळ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारच्या बोनेटमधून धूर येऊ लागल्याने चालकाने त्वरीत गाडी बाजूला घेतली. त्यानंतर बोनेट उघडले असता गाडीने पेट घेतला. हळूहळू आग पसरली आणि गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पनवेल येथील ओंकार कृष्णा बसवंत व सुचिता कृष्णा बसवंत हे भाऊ- बहीण गाडी क्र.( एमएच ०१ डीपी ०८५१) मधून गुरुवारी पाचगणी महाबळेश्वरला फिरायला निघाले होते. वाईहून पाचगणीला जात असताना दुपारी अडीचच्या सुमारास पसरणी घाटातील दत्त मंदिराच्या अलीकडे गाडीतून धूर येऊ लागल्याने चालक ओंकारने गाडी बाजूला घेतली तेव्हा लागलीच चालकाला नेमकं काय घडलंय हे समजलं. घडला प्रकार समजताच गाडीत बसलेली भावंडं देखील लगेच खाली उतरली.

घाटात वाहतूक कोंडी

या घटनेची माहिती मिळताच वाई – पाचगणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचगणी पालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. दरम्यानच्या काळात घाटात वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही काळानंतर ही वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Running car gets burned in wai pachgani pasarani ghat no one injured pmw